Ravet: महापालिका रावेत बंधा-यातील गाळ काढणार; पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार

साडेतीन लाखाचा खर्च; स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रावेत बंधा-यातील गाळ काढणार आहे. गाळ काढल्यानंतर बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. दापोडीतील राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी भवन या शासकीय संस्थेस थेट पद्धतीने हे काम देण्यात आले आहे. यासाठी त्यांना 3 लाख 68 हजार 266 रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तात्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन बांधण्यात आला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्या वाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधा-याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्यस्थितीत रावेत येथील बंधा-यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 30 एमएलडी जलउपसा करते.

  • रावेत येथील बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधा-याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतात. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्यस्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी झाली आहे. या बंधा-यातून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीउपसा केला जातो. या बंधा-यात एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. महापालिकेतर्फे बंधा-यातील साठलेला गाळ काढण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु, पाण्यातील गाळ काढण्यात मर्यादा येतात. नदीचे पात्र रुंद असल्याने काठावरील आणि नदीपात्रातील काही अंतरापर्यंत गाळ काढणे शक्य होते. तसेच नदीतील मध्य भागातील गाळ काढता येत नाही.

अशुद्ध जलउपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहामध्ये काही ठिकाणी उंचावटे आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यास जलउपसा करण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, पाण्याचा विसर्ग ‘डिसचार्ज’ होतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेने दापोडीतील राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी भवनास विचारणा केली. त्यांच्याकडे 20 मी बुम असलेले पोकलेन आहे. या बुमच्या सहाय्याने नदीमधील गाळ, माती काढता येऊ शकेल. त्याला निडल लावल्यास खडक फोडणे शक्य होईल.

  • यामुळे बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचबरोबर अशुद्ध जलउपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत त्यांच्याकडील मशनरी इतर कुठे वापरात नसल्याने या कामासाठी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे रावेत येथील जुन्या बंधा-याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे’ या कामाअंतर्गत या शासकीय संस्थेस निविदा न मागविता थेट पद्धतीने काम देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना तीन लाख 68 हजार 266 रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.