Pune : उत्कृष्ट लेखनासाठी चांगले साहित्य वाचावे-डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज :  “आजचे शिक्षण ज्ञानाची तृष्णा भागवण्यापेक्षा पदवी मिळविण्यापुरते झालेले आहे. अंधाराला कोंडून विद्यार्थ्यांच्या मनात उजेड निर्माण करण्याचे व उत्कृष्ट अभिव्यक्तीचे बळ देण्याचे काम शिक्षकांचे आहे. जातीविरहित समाज निर्मितीचे काम या संमेलनातून करायचे आहे. जे कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेने यापूर्वीच सुरू केले आहे. सर्वांनीच चांगल्या लेखकांची पुस्तके वाचावीत व त्यांना ऐकावे म्हणजे उत्कृष्ट लेखन करता येईल,” असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रामचंद्र देखणे यांनी सहावे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनात व्यक्त केले. मानवतेचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला बंधुत्वाचे तत्व अंगिकारले पाहिजे, असेही डॉ. देखणे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच सहाव्या विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले. यावेळी  पार पडले. या संमेलनाचे उद्धाटन देखणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकड़े, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, संमेलनाध्यक्ष प्राचार्य अरुण आंधळे, समन्वयक डॉ. रवींद्र पाटील, संयोजक महेंद्र भारती आदी उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, ”शिक्षक-विद्यार्थी व साहित्यिक यांच्या त्रिवेणी संगमावर हे साहित्य संमेलन होत आहे. रयत शिक्षण संस्था हे एक जिवंत तीर्थ आहे. बंधुत्वाच्या तत्वानेच मानवतेचे महत्व जपता येते. स्वतः कार्य करत करत दुसऱ्यांनाही कार्य करण्याची प्रेरणा देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र कर्मभूमीत हे संमेलन होत आहे, याचा आनंद आहे.” रयत शिक्षण संस्था व संत परंपरा माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्याचे काम करत असल्याचे प्राचार्य अरुण आंधळे यांनी सांगितले.

प्रबोधनयात्री संमेलनात विलास चव्हाण, भक्ती पानसरे, प्रगती जाधव, ऋषिकेश पवार, क्षितीज देशमुख, माधुरी धायगुडे, संकेत जाधव, शैलेश जंगम, शिवाजीराव शिर्के, प्रकाश रोकडे, निलेश जाधव, संतोष मोहोळकर, मधुश्री ओहाळ व शंकर आथरे यांनी आपल्या कविता सादर केल्या. दादासाहेब खांदवे, माधव गव्हाणे, प्रा. धर्मवीर पाटील यांना प्रबोधनयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समारोपावेळी ज्येष्ठ साहित्यिक ऍड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श रयत सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.