Shree Ganesh Special : श्रीगणेश – ब्रह्मरूप ते नादरूप

एमपीसी न्यूज –  शब्द, नाद, स्वर, ताल, ब्रह्म अशा विविध रूपात उभे राहिलेले गणातील गणेश स्वरूप व्यापक व सर्वसमावेशक आहे. गणेश चतुर्थीनिमित्त वाचा (Shree Ganesh Special) संत साहित्य व लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचा विशेष लेख


श्रीगणेश – ब्रह्मरूप ते नादरूप

लेखक : डॉ. रामचंद्र देखणे

गणेश देवतेचे सांप्रत स्वरूप हे अथर्वशीर्षाच्या रचनाकाली निश्चित झाले. पुराणकारांनी त्याच्या स्वरूपात काही भर घातली, परंतु तत्ववेत्त्यांनी तात्त्विक तत्त्वांना घेऊन रूपकात्मक गणपती उभा केला आहे.संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनीही गणेशाचे ॐ कार रूप वर्णिले आहे. ॐ हा ध्वनी संपूर्ण ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून राहिलेला असून तो अत्यंत सूक्ष्म आहे, असे नादयोगात म्हटले आहे.विश्वरूप वृक्षाचा नामरूपरंगमय विकास व विस्तार ॐ या ध्वनी बीजाने होतो. ॐ पासून निघालेल्या वर्णमालेतील प्रत्येक अक्षर आणि ध्वनी शक्तीगर्भ आहे. ॐ काराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचे काम गणपतीच्या मूर्तीने केले आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचे (Shree Ganesh Special) तात्विक व वाङ्मयीन रूप मांडताना म्हटले आहे

अकार चरणयुगल |

उकार उदर विशाल|

मकार महा मंडल|

मस्तकाकारे ||

हे तिन्ही एकवटले

तेथ शब्द ब्रह्म कवळले

ते मिया गुरुकृपे नमिले

आदि बीज ||

‘अ’कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, ‘उ’कार म्हणजे विशाल पोट आणि ‘म’कार म्हणजे त्याचे मस्तक.अकार उकार आणि मकार अशा तिन्हीचा एकमेळ झाला की  त्यातच सर्व वाङ्मयविश्व सामावते. जिथे शब्द ब्रह्मरूप वेद कवेत मावण्याजोगा होतो, अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे.ज्ञानेश्वर माऊली पुढे गणपतीचे वाङ्मय रूप मांडतात.ते म्हणतात, चारही वेद हे त्या गणपतीचे शरीर आहे. स्मृती हे त्या शरीराचे अवयव आहेत.अठरा पुराणे हे त्याच्या अंगावरील रत्नजडित अलंकार आहेत. शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्याची कोंदणे आहेत. काव्य आणि नाटके ही गणपतीच्या पायातील घागऱ्या असून अर्थरूपी आवाजाने त्या रुणझुणत आहेत. हा गणपती साहित्यरत्नांना सवे घेऊनच नर्तन करीत आहे.

गणेशाचे तात्विक रूप मांडताना ज्ञानेश्वर माऊलींनी विविध प्रतिमा वापरल्या आहेत. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा या दोन्ही गणेशाच्या (Shree Ganesh Special) कानाच्या ठिकाणी आहेत. खूप ऐकण्यासाठी त्याला सुपा एवढे कान लाभले आहेत. सुपाचा गुण कोणता तर फोलफटे फेकून देऊन स्वच्छ धान्य स्वतः जवळ ठेवणे. सर्वांचे बोलणे ऐकायचे, पण त्यातले सार ग्रहण करून बाकीच्या तत्व नसलेल्या गोष्टी उडून द्यायच्या. विवेक ग्रहण करायचा आणि असाराला त्यागायचे. शिवाय मोठे कान हे उत्तम श्रवणभक्तीचेही प्रतीक आहे. या लांब कानाच्या रूपात खूप ऐकण्याची आणि त्यातील सार ग्रहण करण्याची शक्ती गणपतीजवळ आहे.

गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्मदृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. कोणतेही ज्ञान सूक्ष्मतेने ग्रहण करायचे आणि ज्ञानदृष्टी मिळवायची, हेच खरे. गणपतीची लांब सोंड दूरदर्शीपणा दाखवते. गणपतीला दोन सुळे असतात. एक पूर्ण आणि दुसरा अर्धा. पूर्ण सुळा हा श्रद्धेचे प्रतीक आहे तर अर्धा सुळा हे बुद्धीचे प्रतीक आहे. बुद्धी केवळ तर्कावर आधारित असेल तर ती अर्ध्या सुळ्यासारखी असते म्हणून जीवनाच्या विकासासाठी आत्मश्रद्धा आणि ईशश्रद्धा पूर्ण असली पाहिजे.

गणपतीचे चार हात हे जणू चार पुरुषार्थ आहेत. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक आणि चौथा हात आशीर्वादासाठी सिद्ध आहे. मानवी जीवनात या चारही गोष्टींची गरज आहे. विषय, वासना आणि विकारांवर अंकुश, इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पाश आणि जीवनाला आनंदाचा आस्वाद देणारा मोदक असायलाच हवा.

हत्तीच्या गंडस्थळावरून मदरस वाहत असतो. त्या गजमुखाच्या गंडस्थळावरून बोधरुपी मद स्त्रवतो आणि मननशील महात्मे भुंगे होऊन तो सेवन करीत आहेत. श्रुती-स्मृतीमध्ये चर्चिलेली तत्वे ही गणेशाच्या (Shree Ganesh Special) शरीरावर धारण केलेली तेजस्वी पोवळी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात द्वैत आणि अद्वैत असे दोन भिन्न प्रवाह आहेत. द्वैत आणि अद्वैत तत्वज्ञाने ही जणू त्या गणेशाची तुल्यबळे नांदणारी गंडस्थळे आहेत.

उपरि दशोपनिषदे|

जिथे उदारे ज्ञान मकरंदे|

जिथे कुसुमे मुकुटे सुगंधे|

शोभती भली |

ज्ञानरूपी मधामुळे ज्यांचे औदार्य दरवळते आहे, अशी दहाही उपनिषदे ही त्या मूर्तीच्या मुकुटावरील सुगंधी फुलेच होत. त्या उपनिषद रुपी ब्रह्म विद्येच्या किंवा परा विद्येच्या फुलांनी नटून हा गणेश देवता बनला आहे.

ज्ञान-विज्ञानाबरोबर तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून गणेशाचे रूप समजावून घेणे गरजेचे आहे. अथर्वशीर्षात

त्व मूलाधार स्थितोसि नित्यम् |

त्वमेव साक्षात् आत्मासि नित्यम्|

हे गणेशा तूच तत्त्व आहेस. तूच प्रत्यक्ष सूक्ष्म आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस. ज्ञान हे स्वरूप तर विज्ञान हे दृश्यरूप घेऊनच हा गणेश ज्ञान-विज्ञानमय झाला आहे. समर्थ रामदास स्वामींनी गणपतीच्या तत्त्व रुपाबरोबर त्याचे नादरूपही उभे केले आहे. ते म्हणतात….

चौदा विद्यांचा गोसावी |

हरस्व लोचना ते हिलावी |

लवलवित फडकावी |

फडै फडै कर्ण थापा |

तूच 14 विद्यांचा स्वामी असून लहान डोळे हलवीत आणि लवलवीत कान फडकवीत जेव्हा गणराया येतो तेव्हा मूर्तिमंत संगीतच अवतरले जाते. त्याच्या पायात नुपुरे झुणझुण वाजतात. वाद्यांचा सुंदर नाद येतो आणि पायातील घागऱ्याचा ठेक्याने सुंदर पदन्यास उभा राहतो.

नट नाट्य कला दुसरी |

नाना छंदे नृत्य करी |

टाळ मृदुंग भरोबरी |

उपांग हुंगारे

हावभाव आणि कला कौशल्य यांनी तालयुक्त असे जेव्हा नर्तन सुरू होते. टाळ- मृदुंगाची साथ मिळते आणि नृत्याचा हुंकार सुरू होतो, तेव्हाच त्याच्या प्रासादिक नृत्याने ईश्वर सभेस आली शोभा. – संपूर्ण सभा शोभायमान होते. नाद, सूर, ताल, स्वर यांच्या संगतीने गणपती नर्तन करू लागतो.

लोककलाकारांनी या नर्तन करणाऱ्या गणपतीला गणात नाचवले आहे. वैदिक परंपरेलाही जोडत गेलेला हा अथर्वशीर्षातला गणपती  (Shree Ganesh Special) लोकमान्य झाल्यावर लोककलेच्या अंगणी येऊन रिद्धी-सिद्धीसह नर्तन करू लागला. उपनिषदातल्या ॐ कार स्वरूपापासून पुराणातल्या शिवसूतापर्यंत, तत्त्ववेत्त्याच्या ब्रह्मरूपापासून लोककथातील गौरीनंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे स्वरुप लोककलेच्या प्रत्येक अविष्कारात गणाच्या रूपात उभे राहते.

रसिक आतुरतेने वाट पाहतात. लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि नम्रपणे गणेशाला वंदन करतो. लोककला प्रकारातील शाहिरी, तमाशा, लोकनाट्य, दशावतार, गोंधळ, जागरण, लळित या सर्वच कला प्रकारांच्या आरंभी गणरायाला नमन करून गण सादर केला जातो. हे गणराया तूच समुदायाचा प्रभू आहेस. ज्ञानी जगात तूच अत्यंत ज्ञानी, कीर्तीवंतात तूच वरिष्ठ, शाहिरांनी ज्यांचे पोवाडे गावे असा शाहिरांचाही आदर्श तूच आहेस. म्हणूनच

ये ब्रह्म्याचे धावत नंदिनी

जिव्हेवरती बस माझ्या |

नाचत रंगणी रंग आणावा

अभंग सुस्वर ताल मजा|

जगातील कीर्तीवंतांचे कीर्ती काव्य गाण्यासाठी तूच माझ्या जिभेवर येऊन बस. आपल्या शब्दांसह नाचत रंगणी येऊन या शाहिरीमध्ये रंग भर आणि रसिकांना मुजरा करीत गणपतीला गणातून आवाहन केले जाते. शाहिरी गणामध्ये गणपतीच्या स्वरूपा बरोबर त्याच्या पराक्रमाचेही वर्णन केले आहे. सकल जगाला बुद्धीचा, ज्ञानाचा प्रकाश देणारा तूच आहेस. तूच कलावंतांची प्रतिभा आहेस आणि प्रेरणाही आहेस. तूच रसरंगाचा राणा आहेस. म्हणूनच शाहीर पठ्ठे बापूरावांनी या गणामध्ये गणपतीला नाचत आणले आहे.

छुम छुम छनाना छानाना

छुम छुम छनना

सिद्ध गजानना

नाचत येई रणा

सामवेदाचा आज मारू ताना….

पठ्ठे बापूराव म्हणतात तूच स्वयंसिद्ध आहेस. तुझ्या पायातली नुपुरे वाजवीत ये. या तुझ्या नर्तनात रंगलेले आम्ही तमाशातून सामवेदाचे स्वरूप उभे करीत आहोत. लोककलेतून तुझ्या रूपाचे वर्णन करणाऱ्या वेदांतालाच मांडीत आहोत. ज्याच्या साध्यासाठी वेद आतुर झाले आहेत, ज्या साध्यासाठी ज्ञानी, तत्त्ववेत्ते, योगी, उपासक प्रयत्न करीत आहेत. आज तेच साध्य आमच्यापुढे उभे आहे. नुसते उभे नाही तर सर्वस्व विसरून सप्तसुरांच्या आणि तालांच्या संगतीने नाचत आले आहे.

शुभ मंगल चरणी गण नाचला

नाचला कसा तरी पाहू चला

सहा रागाने रस आचविला

छत्तीस रागिण्या बैसल्या उशाला…

तत्त्ववेत्त्यांना अनाकलनीय, पांडित्याला कानडा असणारे हे ओंकार ब्रह्म लोककलेच्या अंगणी नर्तन करते आहे. शब्द, नाद, स्वर, ताल, ब्रह्म अशा विविध रूपात उभे राहिलेले गणातील गणेश स्वरूप व्यापक व समावेशक आहे. तत्त्ववेत्त्यांनी, संतांनी त्याचे तात्त्विक आणि वाङ्मयीन रूप मांडले तर शाहिरांनी गणातल्या गणपतीला ब्रह्म स्वरूपापासून लोकाचारापर्यंत नेऊन त्याचे लोकवाङ्मयीन गोजिरी रूप उभे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.