Pimpri News: मालमत्तेची स्वत: नोंदणी करा अन् सामान्य करामध्ये 5 टक्के सवलत मिळवा

एमपीसी न्यूज –  मालमत्ता कराची आकारणा करण्याकरिता स्वत: मालमत्तेची नोंदणी करणा-या मालमत्ताधारकांना पिंपरी-चिंचवड महापालिका सामान्य करात 5 टक्के सवलत देणार आहे. ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ या योजनेद्वारे स्वयंस्फुर्तीने मालमत्ता कराची नोंदणी करणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. मालमत्ताधारकांने महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले.

कोरोनामुळे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये नव्याने बांधकामे झाली आहे. या मालमत्तांना प्राधान्याने कर आकारणी होणे आवश्यक आहे. मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी मालमत्ताधारक स्वत:  महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील शिघ्रगणकाद्वारे मालमत्ता  नोंदणीसाठी अर्ज करत असेल. तर, अशा मालमत्तांना सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ ही योजना सुरु करण्यात आली.

या मालमत्ताधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. ज्या वर्षात करआकारणी कायम होईल. त्या आर्थिक वर्षाच्या चालू मागणीतील मालमत्ता बिलामध्ये सामान्य करात 5 टक्के सवलत पहिल्या वर्षाकरिता दिली जाणार आहे. त्यासाठी मालमत्ताधारकाने स्वत:हून महापालिका संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करुन कर आकारणी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

मालमत्ता धारकाच्या दाखल अर्जामध्ये मालमत्तेची कर आकारणी रजिस्टरला नोंद नसल्याबाबत खातरजमा करुन कर आकारणी करण्यात यावी. या योजनेचा लाभ मालमत्ता कर आकारणी झालेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.