Kasarwadi News : घर खाली करत नाही म्हणून भाडेकरूचे साहित्य काढले बाहेर; घर मालकिणीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भाडेकरू घर खाली करीत नाही म्हणून त्याचे साहित्य घराबाहेर काढले. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी कासारवाडी येथे घडली. या प्रकरणी घर मालकिणीसह पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार नौबत प्रसाद (वय 82, रा. सोपान लोंढे बिल्डिंग, नवजीवन चौक, कासारवाडी) यांनी रविवारी (दि. 27) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदार हे 1972 पासून आरोपी महिला यांच्या कासारवाडी येथील सिंगल रूम मध्ये राहण्यास आहेत. त्यांची पत्नी वारल्याने व मूलबाळ दुसरीकडे राहण्यासाठी गेली असल्याने  सध्या ते एकटेच कासारवाडी येथील महिला आरोपीच्या घरात राहतात. फिर्यादी केदार हे खोली खाली करत नाहीत या कारणावरून महिला आरोपीशी यांचा वाद सुरू आहे.

शनिवारी फिर्यादी केदार हे आपल्या मुलीकडे गेले होते. त्यावेळेस घर मालक महिला आरोपी हिने दहा ते पंधरा जणांना सोबत आणले. घरातील फिर्यादी यांच्या दरवाजाचे बिजागरी तोडून दरवाजा उघडून घर सामान घराबाहेर काढून टाकले. त्यात फिर्यादी यांच्या कपाटातील पत्नीचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख पन्नास हजार रुपये असा ऐवज गहाळ झाला आहे. घरामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याने महिला आरोपी घर मालकीणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.