Pune: मनाला समजवा ‘हे ही दिवस जातील…’

review on suicide cases in pune district टाळेबंदीच्या काळात ज्या आत्महत्या झाल्या. त्यात सर्वांत जास्त आत्महत्या आर्थिक चणचण आणि नैराश्य याच कारणातून झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी झालेल्या आत्महत्येच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

एमपीसी न्यूज- आत्महत्या हाच आपल्या दुःख, वेदना, संकटे आणि अडचणींवरील पर्याय आहे, असा गैरसमज करून अनेकजण आत्महत्येचे पाऊल उचलतात. आत्महत्या करणे म्हणजे आपण आपल्या संकटांशी दोन हात न करता भ्याडपणे माघार घेण्यासारखे आहे. पुणे शहरात मागील चार महिन्यात 166 जणांनी आत्महत्या केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यात 46 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

पुणे शहरात मार्च महिन्यात 45, एप्रिल महिन्यात 28, मे महिन्यात 54 आणि जून महिन्यात 39 अशा एकूण चार महिन्यात 166 जणांनी आत्महत्या केल्या.

हा आकडा मागील वर्षीपेक्षा खूप कमी आहे. 2019 या वर्षी मार्च महिन्यात 54, एप्रिल महिन्यात 64, मे महिन्यात 60 आणि जून महिन्यात 47 अशा एकूण चार महिन्यात तब्बल 225 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

टाळेबंदीच्या काळात ज्या आत्महत्या झाल्या. त्यात सर्वांत जास्त आत्महत्या आर्थिक चणचण आणि नैराश्य याच कारणातून झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी झालेल्या आत्महत्येच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात शहरात देखील मे आणि जून या दोन महिन्यात सर्वाधिक आत्महत्येच्या घटना सामोर आल्या आहेत. अपघात आणि इतर आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण टाळेबंदीच्या काळात कमी झाले.

मात्र, आत्महत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात आत्महत्येच्या 46 प्रकरणांची नोंद झाली आहे. प्रत्यक्ष हा आकडा आणखी जास्त असू शकतो.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात मार्च महिन्यात सुरु झाला. त्यानंतर राज्यात देखील ठिकठिकाणी कोरोनाने कहर केला. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदीची घोषणा केली.

या काळात सार्वजनिक वाहतूक, कारखाने, कंपन्या आणि इतर सर्व अस्थापना बंद करण्यात आल्या. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तेवढ्या सुरु ठेवण्यात आल्या.

कुणाची कसलीही तयारी नसताना अचानक आलेल्या या संकटामुळे सर्वजण गांगरून गेले. पुणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत आणि आयटी कंपन्या आहेत.

त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक शहरात वास्तव्य करत आहेत. अचानक जनजीवन ठप्प झाल्याने सर्वजण जागच्या जागी अडकून पडले. त्यात भरीस भर म्हणून रोजगार देखील बंद झाला.

जिल्ह्यात हातावर पोट असलेल्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. परराज्यातील कामगार दररोज मिळेल ते काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत होते. टाळेबंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली.

दरम्यान, शासनाने मोफत धान्यपुरवठा आणि अन्य सवलती देऊन मदतीचा हात दिला. तसेच अनेक सेवाभावी संस्था, नागरिक देखील या काळात पुढे येऊन एकमेकांना मदत करू लागले.

पण मिळणारी मदत तात्पुरती असल्याने काही कालावधीनंतर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अनेकांना होऊ लागली. निम्नवर्ग, निम्न मध्यमवर्ग आणि मध्यम वर्गातील लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

यातून अनेकांना नैराश्य आले. बेरोजगारी, आर्थिक चणचण, कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव यातून अनेकांनी आत्महत्येचे पाऊल टाकले.

भविष्यातील अनिश्चितता दिसू लागली. टाळेबंदीपूर्वी असलेला ताण टाळेबंदीच्या काळात आणखी वाढला. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना भेटणेही कमी झाले होते.

कारण, तणाव कमी करण्यासाठी भावना व्यक्त करणे फार गरजेचे आहे. पण ही परिस्थिती कायम राहणार नाही, हे ही दिवस जातील, असे प्रत्येकाने आपल्या मनाला ठामपणे सागायला हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.