Pune news: उपमहापौर पदावरून रिपाइंत नाराजी ; आठवलेंकडे मांडली कैफीयत

RPI dissatisfied with the post of deputy mayor; complaint to Athavale

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पुन्हा उपमहापौर पद देण्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. मात्र, दोन महिन्यांपासून भाजप नेत्यांकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप करत शहरातील रिपाइंच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे महापालिकेत भाजपा आणि रिपाइंची युती आहे. भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणुक लढवूनही पालिकेत रिपाइंचा वेगळा गट स्थापन करण्यात आला. युती धर्म पाळत भाजपाने उपमहापौर पद रिपाइंसाठी सोडले.

रिपाइंने पहिले अडीच वर्षे दिवंगत नगरसेवक नवनाथ कांबळे आणि त्यानंतर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांना उपमहापौर पदावर संधी दिली. त्यानंतर मागील वर्षी उपमहापौर पद भाजपने स्वतःकडे ठेवत सरस्वती शेंडगे यांना संधी दिली. त्यावेळी रिपाइंने नाराजी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात दंड थोपाटले होते.

त्यावेळी भाजपाने पालिकेतील पदाधिकारी एका वर्षाने बदलले जाणार असून पुन्हा उपमहापौर पद रिपाइंकडे दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर रिपाइंचे नेते भाजपाच्या प्रचारात सक्रीय झाले होते.

परंतु एक वर्षानंतर भाजपाने पालिकेतील पदाधिकारी बदलण्याची प्रक्रीया हाती घेत महिनाभरापूर्वी सभागृहनेतेपदी गणेश बीडकर यांची निवड केली. वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करत रिपाइंच्या नेत्यांनी भाजपकडे उपमहापौर पदाची मागणी केली. त्याला भाजप नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यानुसार रिपाइंच्या शहर कार्यालयात पक्षाच्या नगरसेवकांची व पदाधिकार्‍यांची बैठक देखील झाली. या बैठकीत उपमहापौर पदासाठी सुनिता वाडेकर यांचे नाव निश्चित करून त्यांच्या नावाचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता पाटील, खासदार गिरिष बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर यांना देण्यात आले.

मात्र, मागील दोन महिन्यापासून भाजप नेत्यांकडून केवळ आश्वासन देत टोलवा-टोलवी केली जात आहे. उपमहापौरपद देण्यासंदर्भात काहीच हालचाल केली जात नाही, असा आरोप करत शहरातील रिपाइंच्या नेत्यांनी व नगरसेवकांनी रविवारी पक्षाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची काल (25 जानेवारी) भेट घेत भाजपा नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

शहरातील नेत्यांची कौफियत ऐकल्यानंतर आठवले यांनी त्यांच्या समोरच चंद्रकांत पाटील व खा. बापट यांना फोन लावल्याचे रिपाइंच्या नेत्यांनी सांगितले आहे. तसेच आठवले यांनी याबाबत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.