Alandi News : आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव व गोकुळाष्टमी उत्सव या निमित्ताने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर संजीवन मंदिरात प्रथा परंपरा यांचे पालन करत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र निर्बंध होते. त्यामुळे विविध कार्यक्रमांना शासन नियम अटी यामुळे मर्यादीत संख्येचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु यंदा कोणतेही  निर्बंध नसल्याने या माऊलींच्या जन्मोत्सव निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविक उपस्थित होते.मंदिरा मध्ये आकर्षक अशी पुष्पसजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

गुरुवारी (दि.२२) श्रावण कृ.अष्टमी, शा.शके  (इ.स.१२७५) या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म झाला. श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर दोन्ही श्री विष्णूंचे अवतार. श्रीकृष्ण दैत्यांचा संहार करतात आणि माऊली माणसांमधील वाईटपणा, दृष्टपणा जावा यासाठी प्रार्थना करतात. दोन्हीही अवतार महाविष्णूंचेच पण प्रयोजन वेगळे.

विष्णूचा अवतार ।सखा माझा ज्ञानेश्वर ॥1॥

चला जाऊ अलंकापुरा।संतजनाच्या माहेरा॥2॥

संत सेना महाराज

गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सेवेचे मानकरी संतोष मोझे यांच्यावतीने विश्वस्त हभप अभय महाराज टिळक यांचे हृदयस्पर्शी मधुर वाणीतून कीर्तन सेवा पंखामंडपात आणि विणा मंडपात आळंदीकर गावकरी भजन दरम्यान एकाच सुरु वेळी झाले.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर भगवान श्रीकृष्णाचे रुप साकारले गेले, संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव ठिक मध्यरात्री बारा वाजता समाधीवर पुष्पवृष्टी भाविक भक्तांकडून झाली.तदनंतर माऊलींची आरती होऊन सुंठवडा प्रसाद,उपवासाची खिरापत उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना वाटण्यात आली.मानकरी व सेवेकरी यांना आळंदी देवस्थानच्यावतीने नारळ प्रसाद वाटप झाले. तसेच काही इच्छुक भाविकांकडून मंदिरात उपवासाच्या खिरापतीचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, डी. डी. भोसले पा., राहुल चिताळकर पा. माउलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पा.,श्री आरु व वारकरी संप्रदायातील मान्यवर,हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.