Sangavi : गोळीबार प्रकरणात सरकारी पंच दिला नाही म्हणून महापालिका व जलसंपदा अधिकाऱ्यांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – रक्षक चौकात गोळीबारमध्ये एका गुन्हेगाराचा (Sangavi) भररस्त्यात खून केल्या प्रकरणी पोलिसांना सरकारी पंच म्हणून सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका, जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 23) रक्षक चौक, पिंपळे निलख येथे सागर सर्जेराव शिंदे (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सांगवी पोलिसांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महापालिकेच्या करसंकल विभागाचे सहमंडल अधिकारी यांना सरकारी ‘पंच’ म्हणून सेवा देण्यासाठी पत्रव्यवहार केला.

मात्र, नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पत्राकडे कानाडोळा केला. त्यामुळे सांगवी पोलिसांनी शासन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

पंचाची गरज का असते?

एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिस अधिकारी पंचनामा करतात. पंचनाम्याच्या वेळी उपस्थित असलेल्या पंचाचे जबाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान महत्वपूर्ण ठरतात.

गुन्हा घडल्यापासून ते खटला सुनावणीस येण्यासाठी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी उलटून जातो. अशा वेळी खासगी ‘पंच’ सुनावणी दरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते.

पंच फितूर झाल्यामुळे बहुतांश गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटल्याच्या यापूर्वीच्या नोंदी आहेत. परिणामी दोष सिद्धीचे प्रमाण घटू लागले आहे.

ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाकडून सात किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्हयामध्ये ‘पंच’ म्हणुन सरकारी कर्मचा-यांची सेवा घेण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. या आदेशानुसार पोलिस तपासात सरकारी कर्मचाऱ्यांना ‘पंच’ म्हणून सेवा देणे बंधनकारक आहे.

Chakan : खराबवाडीतील कचरा डेपोवर हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे, तर कचरा टाकणाऱ्यावर होणार गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.