Sangvi : भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्यावरून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – भजी खाल्ल्यानंतर त्याचे पैसे मागणा-या हॉटेल चालकावर त्याच्या घरी जाऊन लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मित्राला देखील मारहाण करून त्याच्यावर वार केले. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

राहुल प्रल्हाद झेंडे (वय 36, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आशुतोष काटे, आतु शेख, महेश जगताप, सलीम पापा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांचे पिंपळे सौदागर येथे नाष्टा सेंटर आहे. आरोपींनी बुधवारी त्यांच्या नाष्टा सेंटरवर येऊन भजी खाल्ली. त्याचे पैसे राहुल यांनी आरोपींकडे मागितले. याचा राग धरून आरोपींनी संगनमत राहुल यांच्या घरी जाऊन त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केले आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.

हे भांडण सोडविण्यासाठी राहुल यांचे मित्र मैलाना शेख आले असता आरोपींनी त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करून कोयत्याने वार केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महेश जगताप याला अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.