Sangvi : ओएलएक्सवर मोबाईल विकणे पडले महागात

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवर मोबाईल फोन विकणे एका भारतीय सेनेतील सैनिकाला महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने सैनिकाला क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून 19 हजार 508 रुपये काढून फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी घडली.

दौलत संपतराव बोरकर (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहारुना ऐसुब (रा. भाटपूर, राजस्थान) व मोकम निरनसिंग आदिवासी (रा. खैरा, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोरकर भारतीय सैन्य दलात मेजर म्हणून नोकरीस आहेत. त्यांना त्यांचा मोबाईल फोन विकायचा होता. त्यांनी त्याची ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्यावरून आरोपीने बोरकर यांच्याशी संपर्क केला. तुमचा मोबाईल फोन विकत घेऊन तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगून आरोपींनी बोरकर यांना क्युआर कोड स्कॅन करायला लावला. क्यू आर कोड स्कॅन केल्यास तुम्हाला पैसे मिळतील असे आरोपींनी बोरकर यांना आमिष दाखवले. बोरकर यांनी कोड स्कॅन केला असता आरोपींनी बोरकर यांच्या खात्यावरून 19 हजार 508 रुपये काढून त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.