Sangvi crime News : केअर टेकर म्हणून काम करणारा तरुणच निघाला ‘चोर’

एमपीसी न्यूज – केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने काम करत असलेल्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारला आणि काम सोडून निघून गेला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केअर टेकर तरुणाचा नाट्यमय पद्धतीने शोध घेऊन त्याला अटक केली. तसेच चोरून नेलेले 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली.

संदीप भगवान हांडे (वय 25, सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे. मूळ रा. पिंपरखेडा, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. संगीता अजित कांकरिया (वय 52, रा. राजयोग बंगला, क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी) यांनी याबाबत 17 ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकरिया यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना कांकरिया यांच्या मुलाने सांगितले की, चोरीला गेलेले दागिने 20 सप्टेंबर रोजी कपाटात ठेवले होते.

त्यानंतर ते दागिने कधी पाहिले नाहीत. दरम्यान 21 ते 25 सप्टेंबर या काळात एक मुलगा केअर टेकर म्हणून काम करत होता. पण तो अचानक काम सोडून गेला आहे. या माहितीवरून पोलिसांना केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या मुलावर संशय बळावला.

पोलिसांनी त्या तरुणाच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचा ठावठिकाणा शोधला. त्यानंतर त्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याच्याशी संपर्क वाढवला. एके दिवशी त्याला भेटण्याची वेळ ठरवून पोलिसांनी कल्पतरू चौक येथे भेटण्यासाठी बोलावले. तरुण फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपये असा एकूण 6 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने त्याला 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 2) आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाकड विभाग) गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बो-हाडे, पोलीस शिपाई अरुण नरळे, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, शिमोन चांदेकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.