Sangvi : व्यवसायातील दोन भागीदारांकडून एका भागीदाराची फसवणूक

एमपीसी न्यूज – भागीदारीत सुरू असलेल्या जीमच्या व्यवसायात दोन भागीदारांनी एका भागीदाराची फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजीव सुरेश कदम (वय 73 रा. संगमवाडी, खडकी) आणि नीलेश शंकर वाडेकर (रा. रविवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपेश अनिल शेट (वय 42 रा. कॅम्प, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोव्हेंबर 2018 ते 17 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये पिंपळे सौदागर येथे घडली. आरोपी आणि फिर्यादी यांनी भागीदारीमध्ये पिंपळे सौदागरमधील कोकणे चौकात तळवलकर जिम सुरू केली. आरोपींनी फिर्यादी दीपेश यांना ‘जिममधील तू तुझ्या हिस्सा काढून घे, आम्ही तुला तुझ्या वाट्याचे 45 लाख रुपये देतो’ असे सांगितले. मात्र आरोपींनी त्यांना पैसे दिले नाहीत. तसेच जिममध्ये येणाऱ्या सदस्यांकडून प्युअर फिटनेस नावाची पावती देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले. सदस्यांकडून जमा झालेले पैसे नेहमीच्या खात्यावर न भरता आरोपींनी एचडीएफसी बँकेत नव्याने काढलेल्या एम.एस. फिटनेस नावाच्या अकाऊंटवर जमा केले. तसेच जिममधून मिळणाऱ्या नफ्यातून कर्जाचे हप्ते न भरता फिर्यादी दीपेश यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.