Sangvi : पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आठ जणांच्या टोळक्‍यांने एका तरुणावर कोयत्याने जबर वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. जुनी सांगवी येथील जयमालानगरमध्ये ही घटना घडली. शनिवारी (दि. 8) रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

वसीम शफिकउद्दीन खान (वय 30, रा. घर नं.22, जयमालानगर, जुनी सांगवी. मूळ उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन मुरली साळुंखे (वय 19), स्वप्निल विष्णू वेदपाठक (वय 19, दोघेही रा. जुनी सांगवी) यांना अटक करण्यात आली असून गणेश ढमाले, अभिषेक चापे, सूरज म्हस्के यांच्यासह त्यांचे अन्य तिघे साथीदार फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी वसीम याचे आरोपींशी पूर्वी कबुतरे आकाशात उडवण्यावरुन भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी वसिमला त्याच्या घराजवळील रस्त्याजवळ गाठले आणि त्याच्या डोक्‍यात कोयत्याने जीवघेणा वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या वसीमला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.