Pimpri : संस्कारीत व्यक्ती कधीही व्यसन करीत नाही – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब

एमपीसी  न्यूज – सन्मान करणे संस्कारात असते तर अपमान करणे स्वभावात असते. संस्कारीत व्यक्ती कधीही व्यसन करीत नाही. श्रीकृष्णाच्या व्दारकेचा नाश व्यसनामुळे झाल्याची नोंद आहे. संसारीक माणूस सुंगधी फुलांच्या हाराने शोभा वाढविण्याचा प्रयत्न करतो; तर तपस्वी साधू-संत तपस्येने आत्म्याची शोभा वाढवितात. अपेक्षेशिवाय तप करा, तप करुन मिळालेल्या आत्मिक शक्तीमुळे सर्वसाधारण व्यक्ती सर्व संकटावर मात करुन यशस्वी होतो. ‘तन, मन, वाणी’वर विजय मिळवून शुद्ध विवेक बुद्धी सकारात्मकतेकडे वळविली की, आत्मकल्याणाचा मार्ग सापडेल, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी सांगितले. 

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, निसर्गनिर्मित दगडाच्या तुकड्यांना रत्ने मानणे ही एक भ्रामक कल्पना आहे. अन्न-पाणी जीवनास जेवढे आवश्यक आहे. तसेच इतरांच्या जीवनात सुख-शांती येण्यासाठी मधुर वाणीदेखील आवश्यक आहे. वाणीतील मधुरताच माणसाला श्रेष्ठ बनवीत असते. वाणीमधील दुष्ट आणि कठोर शब्द पिढ्यानपिढ्या वैरभाव, व्देष निर्माण करतात. त्यामुळे सर्वांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.