Talegaon Crime News : सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करा; गृहमंत्र्यांकडे मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची केंद्रीय गृहमंत्री अमिश शहा यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून बंद करण्यात आला आहे. तपास समाधानकारक झाला नसल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

प्रदीप नाईक यांनी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, माहिती अधिकार कायदा म्हणजे काय, त्याचा उपयोग कुठे, कसा करावा याचे महत्त्व मावळ तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी मावळ तालुक्यातील नागरिकांना पटवून दिले. त्यांनी मावळ तालुक्यातील अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचार माहिती अधिकाराच्या माध्यमातून समाजासमोर आणले.

आयआरबी या संस्थेने ‘रस्ते बांधणी व पुनर्वापर’ या प्रकल्पासाठी ज्या भागातून हा प्रकल्प जाणार आहे, त्या भागातील शेतक-यांच्या लाखो एकर जमिनी हडपल्या. हा स्थानिकांवर अन्याय होता. यामुळे कित्येक स्थानिक देशोधडीला लागले. ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता, त्यांना कमी प्रमाणात मोबदला देऊन, काहींना दहशतीच्या माध्यमातून त्यांच्या जमिनी बळकावल्या असल्याचे प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

सतीश शेट्टी यांची अज्ञातांनी हत्या केली. त्यांच्या हत्येचा तपास अनेक यंत्रणांनी केला. मात्र तपास यंत्रणांनी त्यांचा अहवाल समाधानकारकपणे दिला नाही. त्यामुळे या हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सुरु करून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करावा, अशी मागणी नाईक यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.