Pune News : पुणे जिल्ह्यातील शाळांची घंटा आजपासून पुन्हा वाजणार

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत बैठक घेतली. यामध्ये स्थानिक परिस्थितीचा विचार करून शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील शाळा आज (मंगळवार, दि. 1 फेब्रुवारी) पासून पुन्हा भरणार आहेत.

पहिली ते आठवीपर्यंतचे अर्ध्या सत्रातील वर्ग तर नववीपासून पुढील सर्व शाळा व महाविद्यालयाचे वर्ग पूर्ण सत्रात सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी रात्री आदेश दिले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की –

# पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग (अर्ध सत्र कालावधीत) 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होणार

# पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील नववीपासून पुढील सर्व माध्यमिक व महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग नियमित सुरु राहतील.

# शाळा महाविद्यालयांनी शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य व स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबतच्या मागदर्शक सुचना तसेच मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझेशन या बाबतच्या नियमांचे ( Covid Appropriate Behavior) तसेच शासनाकडील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडील कोविड- 19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

# शाळेतील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोविड 19 लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 48 तासापूर्वीची RT-PCR चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवावे लागणार

# शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी Thermometer, Thermal Scanner / Gun, Pulse Oximeter, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता करण्यात यावी.

# शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे.

# वर्ग खोली तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distance) च्या नियमानुसार असावे.

# शाळेत दर्शनी भागावर ( Physical Distance), मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना posters / stickers लावण्यात यावे, शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान 6 फुट इतकी शारीरिक अंतर (Physical Distance) राखले जाईल याकरिता विशिष्ठ चिन्हांकन करण्यात यावे, शारीरिक अंतर (Physical Distance) राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा-या बाणाच्या खुणा करण्यात याव्यात, याबाबतची व्यवस्था शाळेने करणे आवश्यक राहील.

# विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी.

# शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करण्यात यावा. स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे, याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करुन घेणे आवश्यक राहील.

# पुणे व खडकी छावणी परिषद पुणे व खडकी छावणी परिषद कार्यक्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने तेथे आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या आदेशातील कोरोना निर्बंध विषयक अटी व शर्ती लागू राहतील.

# देहूरोड छावणी परिषद- देहूरोड छावणी परिषद कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने तेथे आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे आदेशातील कोरोना निर्बंध विषयक अटी व शर्ती लागू राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.