School Fee Reduction : मोठी बातमी ! राज्यातल्या शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी

एमपीसी न्यूज – राज्यातल्या शाळांची चालू वर्षाची फी 15 टक्के कमी करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलंय. येत्या दोन दिवसांत याविषयीची अधिसूचना येणार आहे.

हा निर्णय सर्व बोर्डांच्या शाळांसाठी बांधील असेल आणि ज्या पालकांनी आधी फी भरलेली आहे, त्याविषयी काय करता येईल याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शाळांनी फी वाढवू नये आणि शाळा बंद असताना ज्या विविध विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाहीय किंवा घेता येत नाहीय त्याचीही फी आकारली जाऊ नये, अशी मागणी राज्यभरातील पालकांनी केली होती.

हा निर्णय सांगताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘शालेय शुल्क 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये जो निकष ठेवण्यात आलेला आहे, तोच निकष राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला.

या माध्यमातून मुलांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. पालकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. याविषयी येत्या 2 ते 3 दिवसांत आम्ही शाळांना लेखी स्वरूपात कळवू.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.