Hinjawadi : बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेचे दीड लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज – पुणे ते सातारा बस प्रवासादरम्यान अनोळखी चार महिलांनी एका ज्येष्ठ महिलेच्या बॅगमधून साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. एक लाख 42 हजार रुपयांचे दागिने महिला चोरट्यांनी चोरून नेले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता वाकड नाका ते चांदणी चौकाच्या दरम्यान घडली.

सुमन शिवाजी जाधव (वय 65, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. भोसरे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमन शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जात होत्या. वाकड नाका येथून त्या साता-याला जाणा-या मुंबई-वडूज बसमध्ये बसल्या वाकड नाक्यापासून बस चांदणी चौकापर्यंत आली असता सुमन यांनी त्यांची बॅग तपासली. त्यावेळी त्यांना बॅगेतील साडेपाच तोळे सोने सापडले नाही. बसमधील चार अनोळखी महिलांनी त्यांच्या बॅगमधील एक लाख 42 हजार 760 रुपये किमतीचे सोने चोरून नेल्याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.