Pimpri News : सात प्रभाग अध्यक्षाची निवडणूक होणार बिनविरोध; ‘या’ प्रभागात भाजपमध्ये बंडखोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सात प्रभागाच्या अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल. तर, ‘फ’ प्रभागात भाजपमध्ये बंडखोरी झाली असून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. प्रभाग अध्यक्षांचा कार्यकाळ एक वर्षांचा असतो. कोरोनामुळे अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अध्यक्षपदासाठी 29 ऑक्टोबर 2021 रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांचे अर्ज आले. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होणार आहे.

सत्ताधारी भाजपकडून ‘अ’ प्रभाग अध्यक्ष पदासाठी शैलेश मोरे, ‘ब’ सुरेश भोईर, ‘क’ राजेंद्र लांडगे, ‘ड’ सागर अंगोळकर, ‘इ’ विकास डोळस, ‘ग’ अभिषेक बारणे, ‘ह’ अंबरनाथ कांबळे यांचे एकमेव अर्ज आले आहेत. अर्ज बाद होऊ नये यासाठी या सर्वांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यांच्या निवडीवर शुक्रवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. तर, ‘फ’ प्रभागात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष कुंदन गायकवाड आणि अश्विनी बोबडे या दोघांचे अर्ज आले आहेत. बोबडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून कमल घोलप तर अनुमोदक संजय नेवाळे यांची स्वाक्षरी आहे. दोघांपैकी कोण अर्ज मागे घेणार की निवडणूक होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी 2022 च्या पहिला आठवड्यात लागेल. त्यामुळे नवीन प्रभाग अध्यक्षांना केवळ दीड ते दोन महिन्याचा कालावधी मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.