Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख – 34 – पहिला आणि शेवटचा मराठी सुपरस्टार डॉ काशिनाथ घाणेकर

एमपीसी न्यूज : राजेश खन्ना म्हणे हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार. असेल नव्हे असेलच. पण आपल्या मराठी  नाट्य/चित्रसृष्टीतही एक सुपरस्टार होऊन गेला. (Shapit Gandharva) मराठी नाटकाच्या इतिहासात केवळ एन्ट्रीलाही ज्या एकमेव सुपरस्टारला शिट्टी नव्हे शिट्ट्या पडत असत, तो मराठी नाट्यसृष्टीवर अखेरपर्यंत अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके डॉ. काशिनाथ घाणेकर  ऊर्फ असंख्य नाट्यरसिकांचा लाडका ‘लाल्या’.

काळजाचा ठाव घेणारे कमालीचे भेदक पण तितकेच बोलके डोळे, जबरदस्त संवादफेक, एकही शब्द न बोलताही सर्व काही सांगून जाणारा बोलका चेहरा आणि या सर्वांबरोबरच अफाट अभिनयक्षमता. काय नव्हते डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्याकडे?

होय, त्यांच्याकडे सर्व काही होते अन् त्याचसोबत चोरपावलांनी आलेले पण आल्यानंतर श्वासाइतकेच जवळीक साधलेले व्यसनही या महान कलावंताच्या लखलखत्या कारकिर्दीला कधीही न पुसला जाणारा डाग म्हणून चिकटून बसले ते बसलेच. त्याने त्यांची साथ जी धरली ती सावलीसारखीच आणि अखेर त्यांना सोबत घेऊन गेल्यानंतरच समाधान मानले. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1930 रोजी चिपळूण येथे झाला. (Shapit Gandharva) त्यांच्या घरातले वातावरण सुखेनैव होते. डॉक्टर बालपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी आपला पहिला नंबर कधीही सोडला नाही. त्यांनी बारावीत घवघवीत यश मिळवून वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला. ते दंतचिकित्सक झाले.

याच दरम्यान त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. या आवडीने त्यांना पार झपाटून टाकले. त्यांचे लग्न त्या काळच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. इरावती कर्णिक यांच्यासोबत झाले होते. इरावती यांनी त्यांची ही आवड मान्य करून त्यांना नाट्यसृष्टीत आपले नशीब आजमावून बघायला परवानगीही दिली होती. त्यांना नशिबानेही उत्तम साथ दिली आणि सुप्रसिद्ध नाटककार स्व. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका मिळाली, जी त्यांच्या अभिनयाने डॉक्टर घाणेकर यांनी अक्षरशः अजरामर करून टाकली. त्यांच्याइतकी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रभावी भूमिका कोणालाही करता येणे शक्य नाही, असेच तमाम समीक्षक आणि मोठमोठे नाटककार म्हणत असत. या यशामुळे त्याकाळी सर्वाधिक बिदागी घेणारे अभिनेते म्हणून त्यांचे नाव सर्वदूर चर्चेत होते. यानंतर आलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’ या कानेटकर यांच्याच नाटकाने त्यांना प्रचंड यश मिळवून देत यशाच्या परमोच्च शिखरावर दिमाखात विराजमान केले.

 

 

Maharashtra : पीएमपीएमएलच्या चालकाचा दिल्लीमध्ये सुरक्षा पुरस्काराने सन्मान

मात्र यासोबतच त्यांच्या आयुष्यात आधी चोरपावलांनी प्रवेश केलेल्या व्यसनाने नंतर त्यांच्यावर राजरोस कब्जा केला. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने त्यांचे सतत दौरे असत. प्रत्येक प्रयोगाला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, चाहत्यांचे अफाट प्रेम कितीही नाही म्हटले तरी कळत नकळत का होईना पण अहंपणाची नशा करत होते. त्यातूनच त्यांचा मूळचा स्पष्टवक्तेपणा कधी फटकळपणात रूपांतरित झाला हे समजलेही नाही. (Shapit Gandharva) अशाच एका वादग्रस्त प्रसंगातून त्यांनी थेट वसंतराव कानेटकर यांच्याशीच पंगा घेत यशासोबत अहं येतोच, हेच जणू सोदाहरण सिद्ध केले. यशाच्या ऐन शिखरावर असलेले नाटक मधेच सोडून त्यांनी प्रायोगिक तत्वासोबतच व्यभिचार केला- असे मग आधी दबक्या आवाजात अन् नंतर उघड-उघड बोलले जाऊ लागले.

पण कालांतराने दोघांनीही आपल्या चुका सुधारत पुन्हा एकत्र येऊन मराठी नाट्यसृष्टीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस मिळवून देत तिच्या वैभवात भर घातली. त्यांच्या नाटकांना अभूतपूर्व यश मिळत होते. गारंबीचा बापू , इथे ओशाळला मृत्यू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, आनंदी गोपाळ ही त्यांची नाटके विशेष गाजली, तर हा खेळ सावल्यांचा, चंद्र आहे साक्षीला, मधुचंद्र, पाठलाग, झेप, गारंबीचा बापू , दादी माँ (हिंदी) हे चित्रपट प्रचंड गाजले. डॉ. घाणेकर म्हणजे हमखास यश अशीच व्याख्या त्यांनी निर्माण करून आपल्या नावापुढे ‘मराठीतला पहिला सुपरस्टार’ हे वलय निर्माण करून आपल्या नावाची कीर्ती सर्वत्र वाढवली होती.

यश  मिळणे फार अवघड नाही महाराजा, ते टिकवणे अवघड आणि ते पचवणे तर त्याहूनही अवघड. कदाचित या महान कलाकारालाही यश पचवता आले नाही. नाटकाची यादी वाढत होती, चित्रपट मिळत होते अन् त्याचबरोबर व्यसनही वाढत चालले होते. याचा पहिला फटका बसला वैवाहिक आयुष्याला आतापर्यंत कष्टात धीरोदात्त साथ देणाऱ्या पहिल्या पत्नीने म्हणजेच इरावतीबाईंनी काशिनाथ घाणेकर यांच्याशी बांधलेली साताजन्माची गाठ सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. माणसाला इतर कुठलीही नशा बरी वाटावी अशी नशा पैशाची अन् त्यामुळे आलेल्या मानसन्मानाची असते.

काशिनाथजींना इरावतीबाईंनी दिलेली मोलाची साथ, त्यांचे कर्तृत्व सर्व कळत असूनही त्यांनी त्याबद्दल खंत बाळगली नाही, अन् आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या कांचनसोबत पुन्हा एकदा संसार थाटला. कांचनबाई कोणी ऐऱ्या- गैऱ्या नव्हत्या. त्यांची आई होती मराठी सिनेसृष्टीतले एक मोठे नाव आणि महान कलाकार सुलोचनाबाई लाटकर. अनेक वर्षांच्या विरोधानंतरही कांचन आणि काशिनाथ घाणेकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले अन् त्यांनी जगाची तमा न बाळगता संसारही थाटला.

काशिनाथ घाणेकर नट म्हणून जितके महान होते, माणूस म्हणून तितकेच कलंदर. स्पष्टवक्तेपणा त्यांचा स्थायी भाव होता. अन् याच स्पष्टवक्तेपणाचे रूपांतर जेव्हा फटकळपणात झाले, तेव्हा त्याचा खूप मोठा फटका डॉक्टरांच्या कारकिर्दीला बसला. त्यांना काम मिळेनासे झाले. त्यामुळे पुन्हा व्यसनाचे प्रमाण वाढले. (Shapit Gandharva) मात्र सर्व जग त्यांच्या विरोधात असतानाही ज्येष्ठ  रंगकर्मी आणि नाट्यनिर्माते प्रभाकरपंत पणशीकर डॉक्टरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. अर्थात डॉक्टरांच्या व्यसनाने त्यांनाही मेटाकुटीला आणले होते.  मित्राची मैत्री आणि बायको- मुलीला दिलेला शब्द यामुळे काशिनाथजी पुन्हा एकदा रंगभूमीवर राज्य करायला लागले होतेच की काळाने घाला घातला. 2 मार्च 1986 रोजी अमरावती येथे एका नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधीच त्यांना मेकअपरूममधे हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने म्हणजेच कांचन घाणेकर यांनी लिहिलेले ‘नाथ हा माझा’ हे त्यांच्यावरील पुस्तक खूप गाजले अन् काही वर्षांपूर्वीच सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे अभिनित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला,जो प्रचंड यशस्वी ठरला. या सिनेमातही त्यांच्या व्यसनावर आणि इतर नको त्या गोष्टींवरही बराच प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे मी या लेखात त्यावर काहीच बोलू इच्छित नाही.

माझी लेखमाला अशा शापित पण महान कलाकार, खेळाडू,गायक अशा व्यक्तिचित्रांवर असून या माध्यमातून त्यांना किमान त्यांच्या नसण्यानंतर तरी सद्गती मिळावी, या एकमेव सद्हेतूने असल्याने त्यांच्या सर्वांना माहिती असलेल्या गोष्टी टाळणे हे मानवतेला धरून आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीला अनुसरूनच आहे.(Shapit Gandharva) इतर अनेक गोष्टी असल्या तरी डॉ. काशिनाथ घाणेकर हे नट म्हणून महान होतेच आणि तेच मराठी नाट्य, सिनेमा विश्वातले पहिले सुपरस्टार होते, यात मला तरी कसलीही शंका वाटत नाही. म्हणूनच मराठीतल्या पहिल्या आणि कदाचित एकमेव सुपरस्टार अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, इतकीच प्रार्थना परमेश्वराकडे करतो.

विवेक दिगंबरराव कुलकर्णी 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.