Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 43 – महान पण, कमनशिबी राजिंदर गोयल

एमपीसी न्यूज : त्यांच्याकडे एका दिवसात कितीही (Shapit Gandharva) षटके, तेही प्रभावी टाकण्याची क्षमता होती. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तर ते भल्याभल्या क्रिकेटपटूसाठी जणू कर्दनकाळच ठरत. पण फलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवरही ते फलंदाजांना मेटाकुटीला आणत. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधे 750 विकेट्स घेतल्या, जो विक्रम आजही अबाधित आहे.

त्यांनी 59 वेळा एका डावात 5 वा त्याहून अधिक बळी, तर 18 वेळा दहावा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. त्यांनी 15 वेळा एका सिझनमध्ये 25 वा त्याहून अधिक बळी मिळवून भीम पराक्रम केला. एवढे करुनही त्यांच्या नशिबी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालण्याचा योग कधीही आलाच नाही.

भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधले सार्वकालिन महान डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून त्यांना आजही क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात मानाचे स्थान आहे. ते महान पण तितकेच कमनशीबी व्यक्तिमत्त्व म्हणजेच राजिंदरजी गोयल.

20 सप्टेंबर 1942 रोजी पंजाब प्रांतातल्या नरवाना येथे जन्मलेल्या राजिंदरजी गोयल यांचे चरित्रही पद्माकर शिवलकर यांच्यासारखेच दुर्दैवी आहे. त्यांचे वडील भारतीय रेल्वे मध्ये सहाय्यक रेल्वे मास्तर होते. 1958 पासून त्यांनी सुरू केलेले करियर 1989 पर्यंत चालले. असे सांगितले जाते, की त्यांनी विजय मांजरेकर यांनाही गोलंदाजी केली तर त्यांचे पुत्र संजय मांजरेकर यांनाही.

Ashadhi Ekadashi : ‘कर्म आणि भक्ती यांचा संगम’ म्हणजे आषाढी एकादशी

राष्ट्रीय संघात त्यांना कधीही स्थान मिळाले नसले तरी, असली क्रिकेट रसिकांच्या हृदयात आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधे त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्यासारखे अढळ होते, आहे अन् राहिलही. हरियाणाकडून खेळताना 637 तर उत्तर प्रदेश कडून खेळताना त्यांनी घेतलेल्या 113 विकेट्समुळे 157 प्रथम श्रेणी सामन्यात त्यांच्या नावावर 750 विकेट्स (Shapit Gandharva) आहेत, जो विक्रम आजही अबाधित आहे.

अन् कदाचित यापुढेही राहील. भारताचा विक्रमादित्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावस्कर यांच्या “आयडॉल”मध्ये त्यांचा समावेश आहे. 1974 साली विंडीज विरुद्धच्या एका कसोटी सामन्यात बिशनसिंग बेदी जखमी झाले. अन् राजिंदरजी यांच्यासाठी कसोटी प्रवेशाच्या संधीचे दरवाजे किलकिले झाले असे त्यांना वाटले.

गावस्कर यांनी एका ठिकाणी असे लिहलेले आहे की, या संधीच्या खात्रीने राजिंदरजी यांनी स्वतःसाठी नवीन क्रिकेट किट आणि बूट विकत घेतले. पण, परमेश्वराच्या मनात मात्र त्याना कायम निराश करायचे असेच होते. या कसोटीत त्यांना बारावा खेळाडू म्हणून निवडले गेले आणि पुढच्याच कसोटीत बेदी ठणठणीत होवून संघात परतताच राजिंदरजी यांचा कसोटी प्रवास जणू कायमस्वरूपी संपला, तो संपलाच.

फलंदाजांना जखडून ठेवणे, दीर्घकाळ न थकता गोलंदाजी करणे, राजिंदरजींचे खास वैशिष्ट्य होते. ते कितीही मोठा फलंदाज असला तरी त्याला फटके मारण्याची संधी देत नसत. गोलंदाजीत बदल करण्याची त्यांची क्षमता वादातीत होती. भलेभले फलंदाज या चक्रव्यूहात अडकत. भारतीय संघाचा आणखी एक माजी महान खेळाडू आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष दिलीप वेंगसरकरही त्यांचा फार मोठा चाहता होता.

मुंबई रणजी संघाचा अविभाज्य भाग मानले जाणारे पद्माकरजी शिवलकर सुध्दा त्यांना स्वतःहून (Shapit Gandharva) महान गोलंदाज मानत, तर खुद्द बिशनसिंग बेदीनेही एकदा मोठेपणा दाखवत त्याला जेव्हा संधी मिळाली तेंव्हा, त्यांच्या पेक्षा जास्त ती संधी राजिंदरजी यांना मिळायला हवी होती असे जाहीर वक्तव्य केले होते.

राजिंदरजी यांनी मात्र उत्तम खिलाडूवृत्ती जपत कधीही आपल्यावर अन्याय झाला असे म्हटले नाही. जे नशिबात होते, तेच घडले, हे त्यांना मान्य होते. त्याबद्दल त्यांची कसलीही तक्रार नव्हती.

थोडक्यात काय? तुमच्याकडे केवळ दैवजात प्रतिभा असूनही चालत नाही, त्याचसोबत तुम्हाला हवी- नशिबाची साथ.जी राजिंदरजी यांना कधीही मिळाली नाही. या कटू सत्याने केवळ हळहळणे सोडले तर आपल्या हातात काहीच नसते, काहीही नाही.

अखेर पद्माकर शिवलकर सोबत त्यांनाही बीसीसीआयने आपला सर्वोच्च सर सी. के. नायडू जीवनगौरव देवून त्यांना काही अंशी न्याय देण्याचा प्रयत्न करत कदाचित आपल्याकडून झालेल्या अन्यायाचे परीमार्जन केले. पण तोवर खूपच उशीर झाला होता.
काही-काही गोष्टी दैवाधिन असतात, हेच खरे.

त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्याकडे सन्मानाने नोकरीस ठेवले. त्यानंतर त्यांनी हरियाणा क्रिकेट बोर्डासाठी अध्यक्ष म्हणून काम बघितले. आयुष्यभर बोर्डाकडून वा कोटा पद्धतीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या या महान खेळाडूने आपला अखेरचा श्वास 21 जून 2020 रोजी हरियाणातल्या रोहतास येथे घेतला. कदाचित वर गेल्यावरच त्या जगदीशाने त्यांना असे का केले, याचे सविस्तर उत्तर दिले असेल, कदाचित..!

या महान भारतीय क्रिकेटपटूला भावपूर्ण आदरांजली आणि त्यांच्या आत्म्याला सदगती मिळो, हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना.

– विवेक कुलकर्णी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.