Ashadhi Ekadashi : ‘कर्म आणि भक्ती यांचा संगम’ म्हणजे आषाढी एकादशी

एमपीसी न्यूज : आज आषाढी एकादशी. वैष्णवांची (Ashadhi Ekadashi) दिवाळी. महाराष्ट्रात वारी परंपरा सुरु असल्याने प्रत्येक घराघरात या विषयी आत्मीयता आणि उत्कंठा असते. वारकरी संप्रदयाच्या दृष्टीने तर भगवंताला प्रत्यक्ष अलिंगन देण्याच्या योग.

महाराष्ट्रातील पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ. प्रत्यक्ष श्रीहरी भगवान येथे आत्मीयता आणि उत्कंठा अठ्ठावीस युगे आपल्या भक्तांसाठी विटेवर उभे आहेत. अनेक संतानी आपल्या अभंगामधून या दिवसाचे महात्म्य वर्णन केले आहे.

“ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस” या परंपरेत अखंड वारीची परंपरा सुरु आहे. लाखो भक्त प्रत्यक्ष यात सहभागी होत असतात. जगाच्या पाठीवरील एकमेव अद्वितीय उत्सव, जो सुमारे तीन आठवडे सुरु असतो. 300 किमीचा पायी प्रवास अबालवृद्ध मोठया आनंदाने विना कष्टाने पार पाडत असतात.

या आषाढीचे महत्त्वही अगदी पुराणकाळापासून आहे. खरं तर ही “देवशयनी एकादशी” म्हणून ओळखली जाते. भारतभर या एकादशीचे महत्त्व आहे. ही एकादशी महा एकादशी, थोली एकादशी, हरिशयनी एकादशी, पदम्नाभ शयनी एकादशी, आणि प्रबोधनी एकादशी या नावाने ओळखली जाते.

आषाढ महिन्यात येते म्हणून त्यास ‘आषाढी’ही म्हंटले जाते. ‘आषाढी-कार्तिकी भक्त जन येती’ असेच वर्णन आरतीमध्ये केलेले दिसते.

याची कथा ब्रह़मवैवर्त पुराणात विस्ताराने आली आहे. यामध्ये या दिवशी एक व्रत (Ashadhi Ekadashi) करावे, ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे व्रताचे महात्म्य सांगितले आहे. आषाढ शुक्ल एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा एकत्रित कालावधी. यात भगवान विष्णु क्षीरसागरात शयनासाठी जातात.

Maval : श्रीराम विद्यालयाची आषाढी एकादशी निमित्त दिंडी

भगवान शयन करतात म्हणजे काय करतात? हा विषय खरोखर विचार करण्यासारखा आहे.

देव जागा आहे या भावनेतून आपण निश्चीत रहातो. ‘आता देव शयन करणार आहे, त्यामुळे आता आपण आपला निवांतपणा सोडून कर्म करावयास हवे’ हा संदेश यामधून धर्माने दिला आहे.

आषाढ पासून पावसाळा सुरु होतो. भारतीय जीवन हे शेतीवर आधारीत जीवन आहे. हे चार महिने शेती करण्याचे प्रमुख महिने आहेत.

“आता देव शयन करीत आहेत, त्यामुळे भक्ता तू जागा ( सावध) रहा, आता तुझे कर्म कर” असा संदेश या देवशयनी एकादशीपासून दिला जातो. शेतीप्रधान संस्कृतीमध्ये पावसाचे महत्त्व आहे. शेतीत पिकले, तरच पुढील जीवन सुखकर होणार आहे. त्यामुळे या कर्माची सुरुवात भक्तीमार्गातून करुन त्यातून शक्तीकडे (समृद्धीकडे) जाण्यासाठीच धर्माने काही रुढी परंपरा सुरु केल्या.

पूर्वी आजच्या सारखी कॅलेंडर नव्हती. त्यामुळे तिथीवरुनच सर्व व्यवहार होत होते. प्रत्येक महिन्याच्या प्रमुख तिथीसाठी एक खास सण तयार केला गेला. जो त्या कालावधीचे प्रतिनिधीत्व करीत होता.

वारीच्या निमित्त एकमेकांच्या भेटी होत असत. त्यातून बी – बियाणांची देवाणघेवाण होत असे. एकसंघ समाज एकमेकांसाठी आपोआप एकत्र जमत असे. अनेक समस्या या निमित्ताने निराकरण होत असत. कित्येक सोयरीक, संबंध जुळले जात असत,

‘भक्ती आणि कर्म’ यांचा एकत्रित मिलाप या निमित्ताने आपणांस पहावयास मिळतो. वारीकडे आपल्या पूर्वजांच्या दुरदृष्टीच्या विचारांचे प्रतिक म्हणूनही आपण या उत्सवाकडे पाहिले पाहिजे.

– अजित दि. देशपांडे (संत विचार अध्यासन)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.