Shapith Gandharva : शापित गंधर्व – लेख 19 वा – सुशांतसिंग राजपूत

एमपीसी न्यूज : परमेश्वराने त्याच्याही नकळत त्याला मर्दानी रूप दिले,सोबत आकर्षक चेहराही दिला. आता साक्षात परमेश्वरच एखाद्यावर स्वतःहून प्रसन्न झाल्यावर त्याला काय कमी असेल?खरोखरच त्याला त्याने कुठलीही कमी ठेवली नाही. त्याला अभ्यासातही गती होती,त्याला उत्तम अभिनयाची जाण होती.तो देखणा पुरुष म्हणजेच हँडसम हिरो, उत्तम डान्सर सर्व काही होता. (Shapith Gandharva) साहजिकच त्याला यशही मिळणार होते ते मिळायलाही लागलेच.सारे काही आलबेल चालले असतानाच मध्येच त्या परमेश्वर म्हणवणाऱ्या ला आपण एका मर्त्य माणसाला एकदम सगळे का दिले असे वाटले झाले..!एका क्षणातच हे सत्य मातीमोल झाले.

त्याने नेहमीच प्रत्येकात काही न काही नेहमीच उणीव ठेवलेली असते असे म्हणा वा त्याने दिलेल्या वरदानासोबत एक शापही दिलेला असतो,तसाच शाप यालाही मिळाला.यशाच्या सर्वोच्च शिखरावर तो विराजमान झालेला आहे असे वाटत असतानाच त्याचे वयाच्या अवघ्या 34 व्या(होय,तुम्ही एकदम बरोबर वाचलेले आहे) चौतिसाव्या वर्षी त्याचे आकस्मिक निधन झाले.ते ही इतके दुर्दैवी की आज सुमारे दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्याचे असे अचानक का झाले हा प्रश्न आजही निरुत्तरीतच आहे.तो खरेच आकस्मिक गेला की त्याचा घातपात झाला हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही,याहून मोठे दुर्दैव ते कुठले असते हो?

सुशांतसिंग  राजपूत हेच या शापित गंधर्वाचे नाव आहे.बिहार राज्याच्या पाटणा या राजधानीत जन्मलेल्या सुशांतसिंगचे आयुष्य म्हणजे एक अनाकलनीय कोडे बनून राहीलेले आहे आणि उण्यापुऱ्या 34 वर्षाच्या छोट्याशा कालावधीतही तो एक अमर पण मनाला सल देणारी दंतकथा बनून राहिलेला आहे.

21 जानेवारी 1986 रोजी पाटणा येथे त्याचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला.कृष्णकुमार सिंग आणि उषा सिंग या दाम्पत्याच्या पाच अपत्यामधले सर्वांत छोटे बालक म्हणजेच सुशांतसिंग उर्फ गुलशन.त्याचे वडील बिहार राज्याच्या हातमाग कामगार संस्थेत तांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत होते तर आई उषा सिंग ही एक कुटुंबवत्सल गृहिणी होती.पाटणा येथील सेंट कॅरेन्स स्कुल मधुन त्याने आपले शिक्षण घेतले होते. (Shapith Gandharva) तो शाळेत एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या आईचे निधन 2002 साली अचानकपणे झाल्याने त्याच्या कुटुंबाने दिल्लीत स्थलांतर केले.(ब्रेन हॅमरेजने त्याच्या आईचे निधन झाले.)सुशांतसिंग राजपूतला खगोलशास्त्र याविषयाची फारच आवड होती. त्याला खगोलशास्त्रज्ञच व्हायचे होते पण नंतर त्याने मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेतला, पण अखेरच्या वर्षात त्याने स्वतःला फिल्मी दुनियेत आजमावण्यासाठी कॉलेज सोडून दिले.खरे

तर त्याचे लक्ष शिक्षणात लागत नव्हते, त्याचे मन डान्स आणि अभिनय अकादमीतच रमत होते. त्यामुळे तो कॉलेज मधे जात नव्हता, त्यामुळे कॉलेजने त्याला शेवटच्या वर्षात काढून टाकले होते,याचे त्याला जराही दुःख झाले नाही कारण मुळातच त्याला यात अजिबात रस नव्हता त्याला जे व्हायचे होते ते त्याच्या घरच्यांना पसंत नव्हते म्हणून त्याने वडिलांच्या इच्छेखातर अभियंता व्हायचे ठरवले आणि त्याने ते करण्यासाठी प्रयत्न ही करुन  दाखवले.

खगोलशास्त्र विषयानंतर त्याची दुसरी आवड होती वैमानिक व्हायची किंवा चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावून बघण्याची.यासाठी पूर्वतयारी म्हणून त्याने दिल्लीला असताना सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि डान्सगुरु म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या शामक डावरच्या नृत्य अकादमीत नृत्याचे संपूर्ण प्रशिक्षण घेतले आणि याचसोबत त्याने दिल्लीतील सुप्रसिद्ध आणि मानांकित रंगभूमी दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्या अभिनय प्रशिक्षण संस्थेतून अभिनयाचे धडेही गिरवले.आपल्याला ज्यात रस असतो त्याची जाणीव ज्याला होते आणि जो त्यानुसारच काम करायचे ठरवतो ,यश त्याच्याच गळ्यात यशाची वरमाला घालते.अभिनयाचे धडे गिरवत असतानाच सुशांतला त्याच्या मनाने सांगितले की  तू यात उडी मार,तुला नक्कीच यश मिळेल.सुशांतने आपल्या मनाची साद ऐकली आणि त्याने मायानगरी मुंबईत स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी पहिले पाऊल टाकले.

Today’s Horoscope 29 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

स्वप्न कुणीही बघू शकतो,त्याला काही पैसे लागत नाही की खर्चही येत नाही,पण स्वप्न बघणे वेगळे आणि ते साकार करणे वेगळे.जमीन आसमानचा फरक असतो कल्पना/स्वप्न आणि वास्तवात. असेच एक स्वप्न सुशांतनेही पाहिले होते. किंग खान ,द बिग बी सारखे मुंबईच्या मायानगरीतल्या राज्याच्या सिंहासनावर बसायचे,त्यासाठी घरदार सोडून, शिक्षण सोडून तो दिल्लीवरुन मुंबईत आला.मुंबई नगरी म्हणजे एक महासागरच जणू. ती  कोणालाही आपल्या पोटात सामावून घेते, आसरा देते.शर्त एकच तुम्ही कष्ट करायला हवे.(Shapith Gandharva) सुशांतसिंगकडे ना काही वलय होते, ना पाठीशी कोणी गॉडफादर म्हणून उभे होते, ना तो कुठल्या फिल्मी कुटुंबातील लाडला होता. मात्र या सर्व विरोधी गोष्टी/प्रतिकूल बाजू असूनही त्याच्याकडे एक सकारात्मक अन मोठी बाब होती, ती म्हणजे त्याच्याकडे प्रचंड मोठा आत्मविश्वास होता अन सोबत होती कष्ट करण्याची तयारी.याच जोरावर त्याने मुंबईत पाऊल टाकले.

इथे आल्यानंतर त्याने नादिरा बब्बरच्या (राज बब्बरची पहिली पत्नी) एकजुट म्हणून एका रंगकर्मी संस्थेत प्रवेश मिळवला.इथे त्याने जवळपास अडीच वर्षे जे मिळाले ते काम करत बऱ्यापैकी अनुभव मिळवला.त्यानंतर त्यानेपृथ्वी थिएटरच्या माध्यमातून पहिली मोठी संधी प्राप्त केली. “किस देश मे रहता है मेरा दिल”नावाच्या एका लोकप्रिय मालिकेत त्याला स्वतःची ओळख निर्माण करता आली, असा बऱ्यापैकी चांगला रोल मिळाला होता. याचदरम्यान त्याच्यावर नशिबाची मर्जी खुलली आणि त्याला दूरदर्शनच्या क्षेत्रातील एक अतिशय मोठे नाव असणाऱ्या बालाजी टेलिफिल्मने हेरले.हिंदी झी वाहिनीवरील “पवित्र रिष्ता” या एकता कपूर निर्मित मालिकेत त्याला मानव देशमुख नावाने मोठा रोल मिळाला,ज्याचे त्याने शब्दशः सोने करत आपल्या आगमनाची फिल्मी दुनियेला नांदी दिली. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती, यात त्याची नायिका होती,अंकिता लोखंडे ही मराठी मुलगी. ही मालिका आणि  हो,ही जोडी सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरली, चर्चेत आली.

दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले ,लग्न करणार अशी आवई उठली होती, मात्र नंतर तसे काहीही घडले नाही, मात्र या लोकप्रियतेचा फायदा उचलत या जोडीने अनेक जाहीराती मिळवल्या.सुशांतसिंगला पवित्र रिष्ता मालिकेने नाव, पैसा ,सन्मान सर्व काही मिळवून दिले. झलक दिखला जा या आणखी एका लोकप्रिय शो मध्येही या जोडीने भाग घेत ती लोकप्रियता आणखी मोठी केली. (Shapith Gandharva) आणि याच यशाला खऱ्या अर्थाने फिल्मी भाषेत म्हटले जाते तसे चार चांद लागले जेंव्हा त्याला अभिषेक कपूरने आपल्या ‘काय पो छे” या सुप्रसिद्ध लेखक चेतन भगतच्या ‘द मिस्टेक्स ऑफ माय लाईफ” या एका लोकप्रिय पुस्तकावर आधारित असलेल्या चित्रपटात नायक म्हणून निवडले. या चित्रपटात त्याच्याबरोबर राजकुमार राव आणि अमृता पुरी हे सहकलाकार होते.हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला आणि याच चित्रपटाने त्याला मानाचे पुरस्कारही मिळवून दिले.

 

त्यानंतर त्याला दुसरा चित्रपट मिळाला तो थेट यशराज बॅनरचा.”शुद्ध देशी रोमान्स”या चित्रपटात त्याने नायक म्हणून काम केले आणि त्याची नायिका होती परिणीती चोपडा.एवढ्या मोठ्या बॅनरचा चित्रपट मिळालेल्या सुशांतसिंगने या संधीचे सोने केले आणि बघता-बघता सुशांतसिंग राजपूत हे नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले.फिल्मी दुनियेला बच्चन, खान,कपूर सोडून वेगळ्या नावाचा सुपरस्टार आता दिसू लागला होता.त्याचे मीडियासोबत मोकळेचाकळे वागणे ,त्याचसोबत त्याचे पाय जमिनीवर असणे यामुळे तो लोकप्रियता मिळवण्यात चांगलाच यशस्वी ठरत होता.आणि या समजाला खात्रीने सांगावे असे आणखी एक मोठे यश त्याला मिळाले.

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकवरील चित्रपटात त्याला साक्षात एम्. एस्. धोनीचा रोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. सुशांत ही भूमिका अक्षरशः जगला,तो या पात्राशी इतका एकरूप झाला की पडद्यावर तो नाही, खुद्द धोनीच आहे असे वाटावे असा नैसर्गिक अभिनय त्याने करुन आपले नाव आणखीनच लोकप्रिय करुन यशाचे शिखर गाठले. (Shapith Gandharva) या चित्रपटाने त्याला जे जे हवे होते ते सर्व मिळाले आणि होय चित्रपटसृष्टीला नवा सुपरस्टार सापडला आहे अशा आशयाचे मथळे विविध सिनेनियतकालिकेत झळकू लागले,विविध चॅनेल्सवर त्याचे दर्शन होवू लागले.

हे यश खरोखरच अभूतपूर्व होते. कुठल्याही आधाराविना ,कुठल्याही फिल्मी कुटुंबाशी काहीही संबंध नसणारा बिहारचा एक गांव का छोरा बघताबघता फिल्मी दुनियेत राज्य करायला लागला होता. या चित्रपटानंतर त्याच्या यशाची कमान अधिकच भव्यदिव्य व्हायला लागली होती, वाढत चालली होती.पीके,केदारनाथ, छिछोरे,राबता,सोनचिडीया असे आणखी काही चित्रपट त्याला यशोशिखरावर दिमाखात विराजमान करून गेले. सारेच अतुलनीय, स्वप्नवत, नजर लागावे असे आणि शेवटी लागलीच नजर त्याच्या या छोट्या पण दैदीप्यमान कामगिरीला.

14 जून 2020 चा तो कालदिवस की घातवार, याचदिवशी ती मनहूस अन काळजाला चटका देणारी बातमी देशभरातल्या विविध चॅनेल्सवर ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली असंख्य चाहत्यांना दुःखाच्या खोल गर्तेत ढकलून देत होती.आपल्या बांदरे येथील राहत्या घरी त्याने गळफास घेवून आत्महत्या केली अशी ती बातमी होती, ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता आणि खरंच का बरं बसावा?त्याच्या उज्ज्वल भविष्याला आता कुठे सुरुवात झाली होती, त्याला आता आता यश मिळायला लागले होते. आता आता त्याचे नाव भावी सुपरस्टार म्हणून उल्लेखले जावू लागले होते अन अचानक अशी बातमी यावी,कोणाचा विश्वास बसणार होता?

दुर्दैवाने तो गेला हे सत्य होते. नेमके कसा गेला हे ना तेंव्हा कळाले ना आजही कळत आहे.कोणी म्हणे त्याने आत्महत्या केली,कोणी म्हणे त्याचा घातपात झाला.कोणी म्हणतं त्याचा खूनच झाला आहे तर कोणी काही ,कोणी काही. सत्य काय ते आजही कोणालाही माहिती नाही पण एक उदयोन्मुख सुपरस्टार वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी कधीही परत न येण्याच्या मार्गाने निघून गेला. (Shapith Gandharva) अचानकपणे आलेले नैराश्य,की सुखाच्या परमोच्च क्षणाची अनुभूती भोगत असताना लागलेली नियतीची दुष्ट नजर की खरोखरच इथल्या मुखवट्याआडच्या गलिच्छ चेहऱ्याच्या असली जीवनातली खळपुरुषांनी घातलेल्या घाल्यामुळे ….माहीत नाही, पण या साऱ्याच आरोपांच्या चर्चेतून एकच कटू सत्य बाहेर आले होते, अवघ्या सहा ते सात वर्षात कुठल्याही टेकूविना आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने यशाचे शिखर गाठणाऱ्या या उत्तम आणि अष्टपैलू हरहुन्नरी अभिनेत्याला नियतीने अकाली गिळून टाकले होते.

का?का? का?या प्रश्नांची उत्तरे भल्याभल्यांना मिळाली नाहीत,मिळणार ही नाहीत.तू ही बिगाडे तू ही संवारे असे जगज्जेत्या निर्मात्याला म्हटले जाते त्यात काहीही चुकीचे नाही. पण  तरीही इतकेच म्हणावे वाटते.. हे जगदीशा किमान मृत्यूच्या इतक्या मोठ्या कालावधीनंतर का होईना पण त्याच्या मृत्यूचे खरे काय कारण आहे ते कळू दे.त्याचा खरेचच घातपाती मृत्यू झाला असेल तर त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळू दे आणि त्याच्या खऱ्या चाहत्यांच्या प्रेमाला त्याला न्याय मिळू दे,देशील ना?सुशांतसिंग राजपूतच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याला सदगती मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

विवेक कुलकर्णी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.