Shirur/ Maval: भाजपच्या ‘असहकार’ भूमिकेने शिवसेना खासदारांची चिंता वाढली

समन्वय कसा घडणार ?

एमपीसी न्यूज – मावळ मतदारसंघात येणा-या पिंपरी, चिंचवड आणि शिरुर मतदारसंघातील भोसरीतील भाजप नगरसेवकांनी शिवसेना खासदारांचा प्रचार करण्याबाबत ‘असहकारा’ची भूमिका घेतली आहे. यामुळे उमेदवार असलेल्या विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे यांची चिंता वाढली आहे. भाजपच्या नगरसेवकांचे मन कसे आणि कोण वळविणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपकडून समन्वयक म्हणून नियुक्ती केलेले पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्यातील उमेदवार आहेत. त्यामुळे ते स्वत:च्या प्रचारात गुंतून राहिल्यास समन्वय कोण आणि कसा घडविणार असा प्रश्व निर्माण झाला आहे?

शिवसेना-भाजप युतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिरुर आणि मावळ मतदारसंघ शिवसेनेला सुटले आहेत. शिवसेनेने कालच आपले उमेदवार जाहीर केले. शिरुरमधून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांना आणि मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आढळराव यांना पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान दिले आहे. तर, बारणे यांच्यासमोर थेट पवार घराण्यातील पार्थ उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर देखील तगडे आव्हान आहे. आढळराव आणि बारणे यांचे भवितव्य भाजप पदाधिका-यांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. परंतु, सध्या तरी दोन्ही मतदारसंघातील भाजप पदाधिका-यांनी असहकाराची भूमिका घेतलेली दिसून येते.

भोसरीतील नगरसेवकांनी कालच बैठक घेत खासदार शिवाजीराव आढळराव यांचा प्रचार करण्यास विरोध दर्शविला आहे. भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांची मोठी ताकद आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीला मोदी लाटेत लांडगे यांनी अपक्ष निवडून येण्याची किमया केली होती. त्यामुळे त्यांचा ‘असहकार’ आढळराव यांच्या अडचणीत भर घालणारा आहे.

पाच दिवसांपूर्वी पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील युतीच्या पदाधिका-यांची पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना नेत्या निलम गो-हे यांच्या उपस्थितीत मनोमिलन बैठक झाली. या बैठकीकडे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठ फिरविली. तसेच या बैठकीला जगताप समर्थक एकही नगरसेवक हजर नव्हता. चिंचवड मतदारसंघात जगताप यांची मोठी राजकीय ताकद आहे. जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी बैठकीला दांडी मारत ‘असहकारा’ची भूमिका घेतल्याने शिवसेना खासदार बारणे यांच्या चिंतेत भर पडणार आहे.

शिवसेना-भाजपने कार्यकर्त्यांचे मनोमिनल, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्यासाठी समन्वयकांची नेमणूक केली आहे. शिरुर आणि मावळ मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांची नियुक्ती केली आहे. बापट यांनी दोन मतदारसंघातील पदाधिका-यांची एक बैठकही घेतली. परंतु, या बैठकीत कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसून आले नाही. गिरीश बापट हे पुण्यातील उमेदवार आहेत. त्यामुळे ते स्वत:च्या प्रचारात गुंतून राहिल्यास समन्वय कोण आणि कसा घडविणार असा प्रश्व निर्माण झाला आहे ?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.