Shirur: लोकसभेला विलास लांडे यांनाच उमेदवारी द्या, नगरसेवकांचे शरद पवार यांना साकडे!

लांडे यांना उमेदवारी देण्याची केली शिफारस, शरद पवार म्हणाले पाच दिवसांनी पुन्हा भेटू

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांनी आज (शुक्रवारी) पुण्यात पवार यांची भेट घेऊन लांडे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या नावाची शिफारस केली.

  • आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दोन ते अडीच महिन्यावर निवडणूक येऊन ठेपली आहे. फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे सर्वंच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात बारामती होस्टेल येथे बैठक पार पडली. या बैठकीत पिंपरी शहरातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने विलास लांडे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयुर कलाटे, विनोद नढे, माजी महापौर मोहिनी लांडे, वैशाली घोडेकर, नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, राहुल भोसले, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे, विनया तापकीर यांच्यासह भोसरीतील माजी नगरसेवक उपस्थित होते.

  • शिरुर लोकसभा मतदारसंघात पक्षासाठी चांगले वातावरण आहे. यावेळी पक्षाने विलास लांडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी मतदार संघाची संपुर्ण माहिती घेतली. शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत मी विचारपुर्वक निर्णय घेणार आहे. तुम्ही चार-पाच जण 14 किंवा 15 फेब्रुवारीला पुन्हा या. आपण त्यावर सविस्तर चर्चा करु असे शरद पवार यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ”शिरुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी विलास लांडे यांच्या नावाची भोसरीतील सर्व आजी-माजी नगरसेवकांनी शिफारस केली आहे. लांडे यांच्या उमेदवारीबाबत पवारसाहेब सकारात्मक आहेत. पुन्हा पाच दिवसांनी साहेबांनी आम्हाला भेटायला बोलविले आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.