Pimpri News: राज्यातील जिम चालू करा, कामगार नेते इरफान सय्यद यांनी घेतली खासदार अनिल देसाई यांची भेट

जिम व्यावसायिकांना लाखो रुपयांचे थकीत भाडे, कर्मचारी पगार, लाईट बिल, मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे.

एमपीसी न्यूज – जिम व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंबे आज आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील जिम चालू करण्याची मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफान सय्यद आणि महाराष्ट्र जिम ऑनर असोसिएशनचे निलेश मोरे यांनी शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे. त्यांच्यापुढे जिमचालकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. त्यांना याबाबत धोरणी निर्णय घेऊन राज्यातील जिमचालकांना दिलासा देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. त्यातच गेल्या पाच महिन्यांपासून जिम व्यवसाय संपूर्ण देशात ठप्प आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीप्रमाणे 5 ऑगस्टपासून राज्यात जिम खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंब आज आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील साधारणपणे 15000 जिम चालक, मालक, ट्रेनर हाउसकीपिंग कर्मचारी, योगा टीचर, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशन दुकानाचे मालक, त्यांचे कर्मचारी, न्यूट्रिशन कंपनीचे कामगार, व्यायामशाळा साहित्य बनवणारे कामगार, तसेच इतर अनेक पूरक व्यवसायातील कामगार हे गेल्या पाच महिन्यापासून बेरोजगार आहेत.

जिम व्यावसायिकांना लाखो रुपयांचे थकीत भाडे, कर्मचारी पगार, लाईट बिल, मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. गेली अनेक महिने या व्यावसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले. परंतु, अनलॉक तीनमध्येसुद्धा जिमचालकांची निराशा झाली.

विरोधाभास म्हणजे अनेक व्यवसाय ज्यांनी कोरोना पसरू शकतो ते चालू आहेत. परंतु, व्यायामशाळा ज्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढू शकते. तो, व्यवसाय मात्र सरकारने बंद केला आहे. यावरून सरकार जिमचालकांच्या मागण्यांबाबत किती गंभीर आहे, याची कल्पना येते.

सरकारचे राज्यातील जिमचालकांकडे दुर्लक्ष होत आहे. इतर क्षेत्रांना सरकारकडून आर्थिक अनुदान मिळाले मात्र, जिमचालकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. राज्यातील सर्व जिमचालकांनी जिम चालू करण्यासाठी विशेष नियमावलीदेखील तयार केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टळेल.

इरफान सय्यद म्हणाले, मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अनेक नियम आणि अटी लागू करून, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली.

यामध्ये बाजार, कपडा व्यापारी, डोमेस्टिक एअर लाइन्स, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे. हॉटेल व्यवसायिक, लॉज, गेस्ट हाऊस यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मग जिम व्यावसायिकांनाच परवानगी का देण्यात आली नाही.

जिम व्यवसायिक मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचा अवलंब करण्यास तयार आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंब आज आर्थिक अडचणीत आहेत. जिममधे जिम ट्रेनर व इतरही कर्मचारी काम करतात. त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे.

यासोबतच व्यायाम करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारे प्रोटिन्सची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे त्या व्यावसायिकांची देखील सध्या बिकट अवस्था आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जिम चालकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात. जेणेकरून विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.