_MPC_DIR_MPU_III

Pimpri : आयारामांनीच केले भाजपचे वस्त्रहरण – संजय राऊत

राम कदम यांना निलंबित करण्यासाठी शिवसेना विधीमंडळात आवाज उठविणार 

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – संघ परिवारातून निर्माण झालेला भाजप पक्ष आहे. आत्तापर्यंत त्यानुसारच पक्षाची वाटचाल सुरू होती. परंतु, आता मूळ भाजप राहिला नाही. सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेऊन वाल्याचा वाल्मिकी करण्याचे धोरण स्वीकारले असून या वाल्यांनीच भाजपचे वस्त्रहरण केल्याचा हल्ला, शिवसेना नेते आणि पुणे विभागीय संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी  भाजपवर चढविला आहे. तसेच महिलांचा अवमान करणा-या भाजपचे आमदार राम कदम यांना विधिमंडळात प्रवेश बंदी केली पाहिजे. त्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना आवाज उठविणार असून त्याला विरोधकांसोबत भाजपने देखील पाठिंबा द्यावा, असेही ते म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभानिहाय शिवसेना पदाधिका-यांची आज (गुरुवारी) बैठक घेतली. पक्षसंघटनेबाबत पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य संघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळा कदम, महिलांच्या संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, खासदार श्रीरंग बारणे, मावळचे जिल्हापमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडीच्या शहरसंघटक सुलभा उबाळे, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

खासदार राऊत म्हणाले, सत्तेसाठी भाजपने दुस-या पक्षातील लोकांचा भरणा केला. आयाराम वाचाळगिरी करत आहेत. त्यामध्ये पंढरपूरचे भाजप पुरस्कृत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेले आक्षेपार्ह विधान देशातील जनता अजूनही विसरली नाही. विसरुही शकणार नाही. त्याच्या वेदना अजूनही होत आहेत. अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले वक्तव्य आणि आता भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी मुलींबाबत केलेले वादग्रस्त विधान  हे सर्व पाहिल्यावर हा भाजप अटलजींचा भाजप आहे काय असा प्रश्न पडत आहे? सत्ताधारी पक्षात ही प्रवृत्ती वाढत असून ती घातक आहे. सभ्य असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणाला घेऊन राजकारण करत आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे.

राम कदम यांनी तमाम महिला भगिनींचा अवमान केला आहे. त्यामुळे केवळ माफी मागून हा प्रश्न भागणारा नाही. दोन दिवसांपासून भाजपचे प्रवक्ते मूग गिळून गप्प बसले आहेत. कोणीच काही बोलत नाही. दुस-या पक्षातील एखाद्या व्यक्तीने असे भाष्य केले असता तर काय झाले असते? असे सांगत खासदार राऊत म्हणाले, महिलांचा अवमान होऊनही आता भाजपचे प्रवक्ते मूग गिळून गप्प बसले आहेत. आम्ही काही बोललो तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या फौजा तयार राहतात.

कायदा करणारेच अशी बाष्फळ बडबड करत असतील तर राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचे. तरुणांनी काय आदर्श घ्यायचा. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना संसद, विधीमंडळात पाठविले नाही पाहिजे. भाजपचे आमदार राम कदम यांचे निलंबन करण्यात यावे. निलंबन ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा असून विरोधकांसह भाजपने देखील त्याला पाठिंबा द्यावा, असेही राऊत म्हणाले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.