Pune News : पैसे देण्यासाठी नकार दिल्यान दुकानदारांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : दुकानात नेहमी येणाऱ्या ग्राहकाने दुकान मालकाकडे खर्चासाठी पाचशे रुपये मागितले होते. परंतु पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दुकान मालकावर कोयत्याने वार करण्यात आले. पुण्यातील विश्रांतवाडीतील शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स या दुकानात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.  

या घटनेत फिर्यादी संजय लक्ष्‍मण गोयल (वय 28, महालक्ष्मी विहर सोसायटी विश्रांतवाडी पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद उत्तम पवार (वय 35, रा.रामगड वस्ती, कळसगाव, विश्रांतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विश्रांतवाडी तील कळस भागात फिर्यादी यांचे हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल्स चे दुकान आहे. आरोपी या दुकानात नेहमी पेंटिंग चे सामान विकत घेण्यासाठी येत होता. दरम्यान रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी दुकानात आला आणि त्यांनी फिर्यादी कडे पाचशे रुपये मागितले. परंतु फिर्यादीने आज धंदा झाला नाही असे सांगत पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने आरोपीने थांब तुझा जीवच घेतो असे म्हणून निघून गेला.

त्यानंतर थोड्या वेळाने हातात लोखंडी कोयता घेऊन आला आणि त्याने फिर्यादीच्या मानेवर कोयत्याने वार केला. यामध्ये फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.