Pune News : नैराश्यातून बँक कर्मचाऱ्यांची खडकवासला धरणात आत्महत्या

एमपीसी न्यूज : एका बँक कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडील पत्नी आणि नंतर आईचा मृत्यू झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुजित उत्तम भालेराव (वय ३८, सध्या रा. कुडजे, ता. हवेली, मूळ रा. औंध) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.  सुचित भालेराव हे मुलीला घेऊन खडकवासला धरण परिसरात असलेल्या कुडजे गावात नातेवाईकांसह राहत होते.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुजित विश्रांतवाडी भागातील एका बँकेत काम करत होते. १० वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. तर चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे आणि तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. कुटुंबातील सदस्यांचे निधन झाल्याने सुजित नैराश्यात होते. आईचे निधन झाल्यानंतर सुजित त्यांच्या मुलीला घेऊन खडकवासला धरण परिसरात असलेल्या कुडजे गावात नातेवाइकांच्या घरी राहायला आले होते.

शनिवारी (१३ मार्च) दुपारी ते कोणाला काही न सांगता घरातून बाहेर निघून गेले होते. धरणाच्या काठावर त्यांनी कपडे काढून ठेवत पाण्यात उडी मारली. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी शोध सुरू केला.  घटनेची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाला कळविण्यात आली.

अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुजित पाटील, जवान प्रल्हाद जिवडे, अक्षय नेवसे, किशोर काळभोर, अक्षय काळे तसेच उत्तमनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक किरण पाटील यांनी शोध मोहीम राबविली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.