Pune News : खेळताना कॅनॉलमध्ये पडल्याने बहिण-भावाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कॅनॉल लगत असलेल्या रस्त्यावर सायकल खेळत असताना वाहत्या कॅनॉलमध्ये पडल्याने दोन सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली. जागृती दत्ता ढवळे (वय 6) आणि शिवराज दत्ता ढवळे (वय 3) अशी मृत्युमुखी पडलेल्या बहीण भावांची नावे आहेत. 

 

या प्रकरणी अधिक माहिती, जागृती आणि शिवराज सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या परिसरात खेळत होते. जागृती सायकल चालवत होती तर शिवराज पाठीमागील सीटवर बसला होता. कॅनॉलच्या दुसऱ्या बाजूला त्यांची आत्या राहत होती. त्यामुळे आत्याकडे जाण्यासाठी ते निघाले होते. दरम्यान कॅनॉल लगतच्या रस्त्याने जात असताना त्याची सायकल घसरली आणि दोघेही कॅनॉलमध्ये पडले. दरम्यान सायंकाळ झाली तरीही मुले न आल्याने आईवडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांना कॅनॉल लगत सायकल व चप्पल पडलेली दिसली.

 

त्यानंतर सोरतापवाडी येथील तरुणांनी या कॅनॉलमध्ये दोन्ही मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तरुणांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील कॅनलमध्ये हे दोन्ही बालके जलपर्णीत अडकल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.