Pune News : ‘नाना पेठेतील भाई आहोत’ म्हणत टोळक्याचा नवी पेठेत राडा

सहा जण अटकेत तर बारा अल्पवयीन मुले ताब्यात

एमपीसी न्यूज : पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने नवी पेठेतील हत्ती गणपती मंदिरासमोरील एका सलूनच्या दुकानात येऊन तुफान राडा घातला. तर एका तरुणावर कोयत्याने वार ही केले. त्यानंतर या टोळक्‍याने हातातील कोईते हवेत उंचावून ‘आम्ही नाना पेठेतील भाई आहोत’ असे म्हणत धमकी दिली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली असून 12 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सनी विनोद महापुरे (वय 19, रा. रघुवंश अपार्टमेंट, फाले नगर, कात्रज पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेश जालिंदर कांबळे (वय 21), प्रतीक युवराज शिंदे (वय 18) यश संजय चव्हाण (वय 20), स्वराज निलेजय वाडेकर (वय 20) वैभव नितीन शहापूरकर (वय 20) आणि देविदास बाळासाहेब गालफाडे (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर सहा ते बारा अल्पवयीन मुलांना ही पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादीचे नवी पेठेत सलून आणि टॅटू चे दुकान आहे. 21 फेब्रुवारी च्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी त्याच्या दुकानात शिरले. कुठे आहे तो केम असे ओरडत फिर्यादीचा आतेभाऊ आदर्श मिसाळ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी पैकी एकाने आज याला जिवंत सोडायची नाही असे म्हणून त्याच्यावर कोयत्याने वार केला. परंतु त्याने तो वार हुकवला आणि पळ काढला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील काचा फोडून काचांचे नुकसान केले.

त्या ठिकाणाहून निघून जाताना आरोपींनी हातातील कोयते हवेत उंचावून दहशत निर्माण केली. तसेच आम्ही “नाना पेठेतील भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नका. एका एका ला कापून टाकू” अशी धमकी देऊन आम्ही “केएमला सोडणार नाही, आता तो सापडला नाही,  सापडला असता तर त्याला दाखविले असते” असे बोलून तेथील लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. आरोपींची या दहशतीमुळे घाबरून लोकांनी दुकानांची शटर बंद केली व आजूबाजूची लोक घाबरून पळून गेली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.