Sneha Dubey : युनोत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणा-या स्नेहा दुबे यांचं पुण्याशी आहे जवळच नातं  

एमपीसी न्यूज – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पुन्हा एकदा काश्मीरबाबत सूर आळवला आहे. पण नेहमीप्रमाणे या वेळीही भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तान दहशतवादी लादेनला शहिद म्हणारा देश आहे. दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देणं हा आजवरचा पाकिस्तानचा इतिहास आहे.

स्नेहा दुबे यांनी 2011 साली पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पण, दुबे यांचं पुण्याशी जवळचे नाते आहे. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात झाले आहे. त्यानंतर त्या पुण्याच्या नामांकित फग्यर्युसन महाविद्यालयातून पदवीधर झाल्या आहेत. पुढे नवी दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. स्नेहा यांना पूर्वीपासूनच आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये रस होता.

इम्रान खान यांनी काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला. त्याला उत्तर देताना स्नेहा दुबे म्हणाल्या, ‘पाकिस्तानी नेते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिमा डागाळतात आणि मूळ मुद्द्यावरुन जागतिक समुदायाचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात, असं सांगून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती तसंच पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीची जगाला कल्पना असल्याचं सांगितलं. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहेत, तरीही भारताचे देशांतर्गत प्रश्न पाकिस्तानकडून जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे.’

‘जम्मू -काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण भाग भारताचा आहे. तो अविभाज्य भाग होता, आहे आणि राहीलही. यामध्ये तो भागही आहे जिथे पाकिस्तानने बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. आम्ही पाकिस्तानला आवाहन करत आहोत की, त्यांनी जो काही भाग अवैधपणे ताब्यात ठेवला आहे तो त्यांनी तात्काळ खाली करावा.’ अशा शब्दात स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.