Pashan : ‘टाकाऊतून टिकाऊ’ संकल्पनेवरील स्पर्धेसाठी 20 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

घनकचरा व्यवस्थापन मॉडेल्सचे 14-15  फेब्रुवारीला पुण्यात प्रदर्शन

एमपीसी न्यूज- स्कायसायक्यू, रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131, ग्यान की, वनराई, पराडकर फाउंडेशन आणि बिग एफ एम 95 या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने’ टाकाऊतुन टिकाऊ’ ( घन कचरा व्यवस्थापन) संकल्पनेवरील वैज्ञानिक मॉडेल्स निर्मिती राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज्यातील 20 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे हे तिसरे वर्षं असून,विजेत्या 150 विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक मॉडेल्सचे प्रदर्शन 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पुण्यात आयसर, पाषाण संस्थेत आयोजित करण्यात आले आहे. ‘स्कायसायक्यू ‘ संस्थेच्या संचालक दीप्ती पुजारी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

मुलांनी बनविलेल्या मॉडेल्समध्ये जुन्या सिडीजचा सोलर कुकर, पेट बाटल्यांचे हॅन्ड वॉश स्टेशन, जलविरहीत आणि दुर्गंधीरहित जुन्या प्लास्टिक कॅन्सचे स्वच्छतागृह इथपासून बाटल्यांपासून शोभेचा धबधबा, नाईट लॅम्प अश्या अनेक गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागांतून आलेल्या आहेत. हा उपक्रम स्कायसायक्यु आणि रोटरी यांचेमार्फत मुलांसाठी दरवर्षी विनामूल्य राबविण्यात येतो.

या स्पर्धेतील निवडक 150 विजेते विद्यार्थी 14 व 15 फेब्रुवारी रोजी आपल्या मॉडेल्ससह पुण्यात येत आहेत. हे प्रदर्शन 14 फेब्रुवारी रोजी आयसर, पाषाण संस्थेत आणि 15 रोजी राष्ट्र सेवा दल (दांडेकर पूल ) येथे भरविण्यात येईल . त्यांना आयसर, पाषाण संस्थेतील दिग्गज शास्त्रज्ञाकडून मार्गदर्शन मिळेल.

निसर्गाची आवड ,विद्यार्थ्यांची विज्ञान निष्ठा वाढवण्यासाठी राष्ट्र सेवा दल (दांडेकर पूल ) येथे डॉ. रघुनाथ माशेलकर त्यांना 15 फेब्रुवारी रोजी 11 ते साडेबारा या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत.

पाचवी ते आठवी व आठवी ते दहावी अशा दोन स्तरावर स्पर्धा आयोजित केली होती. या विषयाचे महत्त्व ओळखून विकास गरड (उपसंचालक महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद विकास प्राधिकरण पुणे )यांनी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई , शिक्षण निरीक्षक मुंबई पश्‍चिम दक्षिण आणि उत्तर यांना सूचित केल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असे दीप्ती पुजारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.