Sonu Sood Effect: आता चक्क ‘सोनू सूद वेल्डिंग वर्कशॉप’

Sonu Sood Effect: Now 'Sonu Sood Welding Workshop' सोनूच्या मदतीने एअर लिफ्ट करुन कोच्चीनहून ओदिशाला पाठवण्यात आलेल्या मजुरांपैकी एकाने स्वत:चे वेल्डींगचे दुकान सुरु केले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाची साथ भरात असताना परराज्यामध्ये अडकलेल्या प्रत्येकाला आपल्या घरी जायची ओढ लागली होती. मुंबईतील स्थलांतरितांच्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या. मात्र त्यांची आपल्या घरी स्वतःच्या खर्चाने पाठवणी करणारा बॉलिवूडमधील अभिनेता सोनू सूद मागील दोन महिन्यांपासूनच चांगलाच चर्चेत आहे. ‘शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहोचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे’, असं सांगणाऱ्या सोनूवर देशभरातील राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सोनूने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्याची ‘घर भेजो’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने मागील दोन महिन्यांमध्ये हजारो मजुरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे.

सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. अनेकजण त्याचे आभार मानण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहे.

ट्विटरवरुन काहीजणांनी चित्राच्या माध्यमातून तर काहींनी व्हिडिओच्या माध्यमातून सोनूला धन्यवाद दिले आहेत. मात्र ओदिशामधील एका मजुराने आपल्या दुकानालाच सोनूचे नाव देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्याचे आभार मानले आहेत.

मानव मंगलानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने इन्स्टाग्रामवरुन या दुकानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये कॅप्शन देताना मानव यांनी सोनूला टॅगही केलं आहे. ‘ही जरी एखादी जाहिरात वाटत असली तरी हे सोनूबद्दलच्या प्रेमातून केलेलं आहे.


सोनूच्या मदतीने एअर लिफ्ट करुन कोच्चीनहून ओदिशाला पाठवण्यात आलेल्या मजुरांपैकी एकाने स्वत:चे वेल्डींगचे दुकान सुरु केले असून त्याला ‘सोनू सूद वेल्डींग वर्क शॉप’ असं नाव दिलं आहे. स्थलांतरितांसाठी देवदूत म्हणून काम करणाऱ्या सोनूबद्दल प्रेम व्यक्त करण्याचे हे प्रयत्न खरोखरच खूप आनंद देणारे आहेत’, असं मानव याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोनू सूदच्या या माणुसकीच्या भावनेतून केलेल्या कामाची दखल अनेकांनी घेतली. त्याची ही कृती अनेकांना भावली. आता तिकडे स्थिरस्थावर झाल्यावर आणि कामाची जरुरी असल्याने हे मजूर परत महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. पण त्यावेळी त्यांच्या आणीबाणीच्या प्रसंगी सोनूने निरपेक्ष भावनेने त्यांना केलेली मदत ते आजही नक्कीच विसरणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.