Special Editorial : विशेष संपादकीय – दिल है छोटासा, छोटीसी आशा…

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानातून भारताला परकीय शक्तींच्या जोखडातून मुक्ती मिळाली. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे (Special Editorial) पूर्ण झाली.

स्वातंत्र्याची ही मधुर फळे चाखताना स्वातंत्र्यासाठी विविध प्रकारचा त्याग करणाऱ्या सर्व देशबांधवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून देत सर्वस्व पणाला लावणाऱ्या प्रत्येक शूरवीराविषयी भारतीय सदैव कृतज्ञ राहतील.

1857 ते 1947 या कालावधीत झालेल्या देशव्यापी मंथनातून अखेर भारताला स्वातंत्र्याचा अमृतकलश प्राप्त झाला. स्वराज्य प्राप्त झाल्यानंतर गेल्या 75 वर्षांतील वाटचालीत देशाने खूप मोठी प्रगती केली आहे, हे मान्य करावेच लागेल. अजूनही खूप काही करण्यासारखे आहे, याची जाणीव प्रत्येक भारतीयाला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना ,स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना भारत कसा असेल आणि ते स्वप्न साकार करण्यात माझे योगदान काय असेल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलेल्या व्यक्तींनी देखील आता वयाची किमान पंच्याहत्तरी ओलांडली आहे. म्हणजेच देशातील बहुतांश नागरिक हे स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आहेत. स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या सुरक्षा कवचात आपल्या पुढच्या पिढ्या वाढल्या आहेत.

75th Independence Day: …आता वाटचाल सुराज्याकडे!

आपल्या आधीच्या पिढ्यांनी देशाला स्वराज्य मिळवून दिले आहे, पण आपण त्या स्वराज्याचे खरोखरच सुराज्य बनवू शकलो आहोत का, हा वादाचा विषय असू शकतो. पण गेल्या 75 वर्षांत भारताने विविध क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

देशाने गेल्या 75 वर्षांत साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींची यादी मोठी आहे. त्याच बरोबर अजूनही साध्य होऊ न शकलेल्या गोष्टींची यादी त्याही पेक्षा मोठी आहे. त्याबाबत ऊहापोह करायचा झाला तर एक स्वतंत्र ग्रंथ काढावा लागेल आणि ‘एमपीसी न्यूज’ लवकरच तशा प्रकारचा एक संग्राह्य ग्रंथ घेऊन आपल्या भेटीस येणार आहे.

भारतातील संसदीय लोकशाही ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. गेल्या 75 वर्षांत भारतामध्ये लोकशाहीची पाळेमुळे खोलवर जाऊन रुजली आहेत. देशाविषयी आत्मीयता वाटण्याचे ते सर्वात मोठे कारण आहे. हा देश माझा आहे. या देशाचे शासन माझे आहे.

देशातील राज्यकर्त्यांनी चुकीचे काम केले तर त्याला बदलण्याचा मताधिकार माझ्याकडे आहे. हा आत्मविश्वास केवळ आणि केवळ लोकशाहीमुळेच आपल्याला प्राप्त झाला आहे. भारतीयांनी आपली ही ताकद वेळोवेळी दाखवून देशातील लोकशाही  अधिक मजबूत केली आहे.

PM Narendra Modi Live : ऐका पंतप्रधान मोदी यांचे 75व्या स्वातंत्र्यदिनी संपूर्ण भाषण

सुराज्य ही संकल्पना परिपूर्णतेकडे जाणारी आहेत. सुराज्याची व्याख्या करायची झाली तर ती व्यक्तीपरत्वे बदलू शकते. अधिकाधिक व्यापक होऊ शकते. देशातील सध्याची परिस्थिती पाहिली तर खरोखरच आपण सुराज्यात आहोत, असा दावा छातीठोकपणे करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पण गेल्या 75 वर्षांत आपण खूप काही सुधारणा करू शकलो आहोत, ही बाबही नाकारता येणार नाही. पण जे काही केलंय हे पुरेसं आहे, असंही म्हणता येत नाही. अजूनही अनेक आव्हाने आपल्या देशापुढे आहेत. त्यावर मात करीत सुराज्याच्या दिशेने झेपावत राहणे, एवढंच आपण करत असतो.

‘रोजा’ या हिंदी चित्रपटातील एक गाजलेलं गाणं आठवत असेल.

दिल है छोटासा, छोटीसी आशा

मस्ती भरे मन की भोलीसी आशा

चाँद तारों को छुने की आशा

आसमानों में उडने की आशा

हे गाणं आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचं आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षांत आपल्याला कितीही मिळालं असलं तरी अजूनही सुराज्याचं स्वप्न साध्य झालेलं नाही. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी काही तरी द्यावंही लागतं. ते योगदानही प्रत्येक भारतीयाने दिलं पाहिजे. म्हणूनच म्हणावसं वाटतं… ए दिल माँगे मोअर! 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.