MPC News Editorial : ‘राम भरोसे’ रेल्वेमंत्री आणि केवळ गप्पांमध्येच अडकलेले सुरक्षा ‘कवच’

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – खंडाळ्याच्या बोरघाटात किंवा पुण्याच्या नवले पुलावर एकापेक्षा अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्याच्या दुर्घटना काही वेळा घडल्या आहे. रस्त्यांवर अशा प्रकारचे अपघात घडल्याचे आपण अनेक वेळा वाचतो. रस्त्यावरील प्रत्येक वाहनावर नियंत्रण ठेवण्यात खूप मर्यादा आहेत. पण जगातील सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या भारतीय रेल्वेच्या इतिहासात तीन रेल्वेगाड्या एकमेकांना धडकण्याची दुर्घटना घडावी, हा रेल्वे प्रवाशांच्या विश्वासाचा खूनच म्हणावा लागेल.

 

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शालीमार–चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (MPC News Editorial ) आणि मालगाडी या तीन गाड्यांची धडक होऊन शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात 260 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात सुमारे एक हजार प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी रेल्वेच्या ‘सुरक्षा कवच’ टक्कर विरोधी यंत्रणेवर प्रश्न निर्माण केला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणात रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती अपेक्षा अश्विनी वैष्णव यांच्याकडून करणे मूर्खपणाचे आहे.

 

अत्यंत अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस विविध मार्गांवर सुरू करण्याचा धडाकाच रेल्वेमंत्र्यांनी लावला आहे. भारतीय रेल्वे झपाट्याने अत्याधुनिक होत आहे, सुरक्षित होत आहे, अशी प्रतिमा उभी करण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत मोठ्या धुमधडाक्यात होणारा मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन समारंभ ओडिशा रेल्वे अपघातामुळे रद्द करण्याची नामुष्की ओढावली. भारतीय रेल्वे करीत असलेल्या प्रगतीसाठी स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या राज्यकर्त्यांना झालेल्या चुकांची जबाबदारीही स्वीकारावी लागणार आहे.

 

Odisha Accident : ही राजकारण करण्याची वेळ नाही -केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

अपघातग्रस्त दोन्ही ट्रेनना पुढे जाण्यासाठी सिग्नल मिळाला होता, ही वस्तुस्थिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. मुख्य ट्रॅकवरून जाण्यासाठी सिग्नल मिळालेला असताना ताशी 125 ते 130 किलोमीटर वेगात असलेली कोरोमंडल एक्स्प्रेस लूप लाईनवर गेलीच कशी आणि लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीवर आदळलीच कशी, हा प्रश्न अजून तरी निरुत्तरीत आहे. या दुर्घटनेत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर केली आहे. या अपघाताची खरी कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याइतपत प्रामाणिकपणा मोदी सरकार दाखवील का? या अपघातामागेही परकीय शक्तींचा हात असल्याचा दावा करीत हात वर तर करणार नाही ना?

 

रेल्वे अंदाजपत्रक सादर होताना टक्कर विरोधी ‘कवच’ या भारतात विकसित केलेल्या सुरक्षा तंत्रज्ञानाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘कवच’च्या नावानं एवढे ढोल बडविण्यात आले की, यापुढे भारतात एकही रेल्वे अपघात होणेच शक्य नाही, अशी सर्वसामान्य नागरिकांची भाबडी भावना झाली. वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण भारतातील रेल्वेच्या जाळ्यासाठी ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. आतापर्यंत मुंबई-दिल्लीसह केवळ दोनच मार्गांवर ही कवच यंत्रणा कार्यान्वित आहे. ओडिशामध्ये अपघात झाला त्या मार्गावर तर ‘कवच’ या शब्दातील ‘क’ देखील पोचला नव्हता, ही दुर्दैवी वस्तुस्थिती या अपघातानंतर पुढे आली आहे. ही बाब स्वप्नांच्या दुनियेत भराऱ्या मारणाऱ्या राज्यकर्त्यांना जमिनीवर आणणारी आहे.

 

अपघात तर झाला आहे. आता अपघातामागील कारणांवर काथ्याकुट सुरू आहे. तांत्रिक चूक आहे की मानवी चूक आहे, याचा शोध सुरू आहे. अपघातात मरण पावलेल्यांचा आकडा मोठा आहे. या शतकातील भारतातील हा सर्वात मोठा अपघात आहे. त्यातून तरी आपण धडा घेणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे बाजूला ठेवलं पाहिजे. अपघातामागील कारणांच्या मूळापर्यंत पोहचून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ ‘उच्चस्तरीय चौकशी समिती’ नेमून वेळकाढूपणाचा फार्स केला तर त्याची मोठी किंमत मोदी सरकारला मोजावी लागेल, यात शंका नाही. 

 

Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार प्लेअर ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला 

 

अपघातात 260 पेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडल्यात एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. या सर्व व्यक्तींच्या परिवारांवर दीर्घकाल टिकून राहणारा हा आघात आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 10 लाख रुपये मदतीमुळे हे नुकसान भरून येण्यासारखे नाही. अनेक प्रवाशांना कायमचे अंपगत्व आले आहे. हजारो जणांच्या जीवनाशी निगडीत हा अपघात आहे. भारतीय रेल्वेशी भावनिक नाते असलेल्या करोडो लोकांशी संबंधित हा प्रश्न आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी अशा वेळी तरी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे.  रेल्वे प्रवाशांना सुरक्षा कवच उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करणे ही काळची गरज आहे. 

 

प्रवाशांना ‘रामभरोसे’ सोडून चालणार नाही. प्रत्येक जीव हा अनमोल आहे. त्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वेमंत्र्यांना स्वीकारावीच लागेल. ओडिशातील रेल्वे अपघात हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील शेवटचा अपघात ठरला तरच ती या अपघातातील मृतांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरणार आहे. ही जबाबदारी रेल्वेमंत्र्यांनी प्रामाणिकपणे, संवेदनशीलपणे पार पाडली नाही तर पुढील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ‘राम’ही वाचवू शकणार नाही. राजीनामा दिलेला परवडला (MPC News Editorial ) असता, पण ‘हा’ वनवास नको, अशी म्हणायची वेळ येईल. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.