Pimpri : ‘नॅशनल वुमेन वेल्डर कॉम्पिटिशन’ची विभागीय फेरीत महिला वेल्डरचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – फिनलँडस्थित केम्पी इंडिया, नेक्स्टजन प्लाझ्मा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅशनल वुमेन वेल्डर कॉम्पिटिशन २०१९’ची विभागीय फेरी पुण्यात झाली. पिंपरी-चिंचवड येथील केम्पी रोबोटिक अप्लिकेशन सेंटरमध्ये पश्चिम विभागीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यातून महिंद्रा
अँड महिंद्रा, जीई, थरमॅक्स, आयनॉक्स इंडिया, ऍडोर वेल्डिंग, आरके दत्ता आदी कंपन्यातील महिला वेल्डर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

आयटीआय, डिप्लोमा होल्डर असलेल्या या महिला वेल्डिंग क्षेत्रात विविध कंपन्यात काम करीत आहेत. एसएमएडब्लू, जीएमएडब्लु, जीटीएडब्लु या तीन प्रकारात वेल्डिंगची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी केम्पी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रश्मीरंजन मोहपात्रा, नॅशनल सेल्स मैनेजर मृगेश सुतारिया, राहुल चिखले, नेक्सजन प्लाझ्माचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय स्पर्धेतून तीन जणींची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी ६ डिसेंबर २०१९ रोजी चेन्नई येथे होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. महिला वेल्डरांना प्रोत्साहन देण्यासाठी केम्पी इंडियाच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजिली जाते.केंद्र सरकारच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत केम्पी इंडिया अनेक राज्यांमध्ये काम करत असून, कौशल्य विकास प्रशिक्षण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण
आणि रोबोटिक प्रशिक्षण यामध्येही केम्पी इंडिया काम करत आहे. यावेळी सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मृगेश सुतारीया म्हणाले, “वेल्डिंग हे महिलांचे क्षेत्र नाही असे बोलले जाते. मात्र, महिला अतिशय चांगल्या पद्धतीने या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि नवीन मुलींनी संकोच न करता वेल्डिंगमध्ये काम करावे, यासाठी ही वेल्डिंग स्पर्धा गेल्या वर्षीपासून आयोजिली जात आहे. दोन्ही वर्षी अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे. ही एक महिला
सक्षमीकरणाची चळवळ आहे. पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे ही विभागीय स्पर्धा होत असून, त्याची अंतिम फेरी चेन्नईमध्ये होणार आहे.”

यावेळी स्पर्धक रसिका लोखंडे म्हणाल्या, गेल्या वर्षीही मी सहभागी झाले होते. या स्पर्धेतून एक वेगळी संधी आम्हा मुलींना मिळत आहे. उषा जाधव म्हणाल्या, स्पर्धेसाठी उपयुक्त प्रशिक्षण मिळाले असून, आमच्यातील कला दाखवण्याचे हे उत्तम व्यासपीठ आहे. वेल्डिंग हे मुलींचे क्षेत्र नसल्याचे बोलले जाते. मात्र, आम्हीही खूप चांगल्या पद्धतीने वेल्डिंगचे काम करू
शकतो, हे सिद्ध करण्याची संधी मिळाल्याचे उर्मिला पालेकरने सांगितले.

दर्शिका गांधी म्हणाल्या, महिलांसाठी ही एक संधी आहे. याने आम्हा महिलांचा आत्मविश्वास वाढेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.