Sreesanth Comeback: मार्ग मोकळा ! सात वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत’चे रणजी संघात पुनरागमन

Sreesanth Comeback: Sreesanth returns to Ranji squad after seven-year ban बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. पण, श्रीसंतने याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढली.

एमपीसी न्यूज – 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सात वर्षांची बंदी भोगलेल्या वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याची केरळ रणजी संघात निवड करण्यात आली आहे. श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी येत्या सप्टेंबरअखेर संपुष्टात येत असून त्याची राज्य संघात निवड झाल्याने त्याला रणजी स्पर्धेत खेळता येणार आहे. संघात येण्याचा श्रीसंतचा मार्ग मोकळा झाला असला तरी  त्याच्या फिटनेसवर सर्व अवलंबून असल्याचे केरळ क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

एकेकाळी भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला आलेला श्रीसंत 2013 सालच्या आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडल्याने त्याच्यावर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. पण, श्रीसंतने याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढली. 2018 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावरील आजीवन बंदचा बीसीसीआयचा निर्णय रद्द केला.

पण 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा निर्णय कायम ठेवला. हा निर्णय देताना न्यायालयाने बीसीसीआयला शिक्षेचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या लोकपाल समितीने श्रीसंतच्या शिक्षेचा कालावधी सात वर्ष केला होता.

श्रीसंतने 2005 साली श्रीलंकेविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुढील वर्षी त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने 27 कसोटीत 87 तर, 53 एकदिवसीय सामन्यांतून 75 बळी मिळवले आहेत.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या 2007 साली झालेल्या T20 विश्वकरंडक स्पर्धेत तसेच 2011 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने सरस कामगिरी केली होती.

त्यानंतर 2013 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याला बंदीला सामोरे जावे लागले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.