Pimpri : गिर्यारोहणामुळे सकारात्मकतेची अनुभूती मिळते – अरविंद वाडकर

एमपीसी न्यूज – ” कैलास मानसरोवर यात्रा युवकांसाठी प्रेरणादायी आहे. अनेक गिर्यारोहकांना ही यात्रा सतत साद देत असते. गिर्यारोहणामुळे परिस्थितीशी झगडण्याची, सकारात्मकतेची आणि समयसुचकतेची अनुभूती मिळते. निसर्गाशी एकरूप होत अवर्णनीय आनंद लुटता येतो. एका बाजूला हिमालयाची उंच उंच शिखरे तर दुसऱ्या बाजूला अतिशय वेगवान प्रवाहाच्या नद्या. लहरी हवामान, बदलते वातावरण या पार्श्वभूमीवर जिद्द आणि चिकाटीची कसोटी लागते. परंतु त्याही परिस्थितीत प्रत्येकाने एकदा तरी कैलास मानसरोवर यात्रा केली पाहिजे” असे जेष्ठ गिर्यारोहक अरविंद वाडकर यांनी मत व्यक्त केले.

स्वा. सावरकर प्रतिष्ठान व मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित सिद्धिविनायक मासिक व्याख्यानमालेतील 162 वे पुष्प श्री. वाडकर यांनी “कैलास मानसरोवर : एक स्मरणयात्रा ” या विषयावर गुंफले.  अध्यक्षस्थानी मधुकर बाबर होते. यावेळी  महापौर राहुल जाधव, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, साहित्यिक राज अहेरराव, कवी सुरेश कंक, अंतरा देशपांडे, संजय ढेम्बरे, संपत बोत्रे, अनिल गोडसे, राहुल वाडकर, संजय ढमढेरे, महेश पवार, राहुल गावडे , माधुरी ओक,  आदी उपस्थित होते.

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केल्याबद्दल स्वा. सावरकर प्रतिष्ठान व मित्र मंडळ, जेष्ठ नागरिक संघ, पिंपरी चिंचवड साहित्य मंच, साहित्य संवर्धन समिती, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ यांच्या वतीने व महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते अरविंद वाडकर यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

वाडकर पुढे म्हणाले की, ” कैलास मानसरोवर यात्रा ही अध्यात्मिक , भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. भारत आणि तिबेट मधील अतिशय दुर्गम आणि खडतर भागातून अतिउंचावरून मार्गक्रमण करावे लागते. सरोवराच्या पाण्याचे रंग सूर्याच्या कलाने बदलताना दिसतात. भारतीय सैन्याचे पदोपदी सहकार्य यात्रेदरम्यान मिळते. हिमालायमध्ये सुद्धा पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व जाणवते. महाराष्ट्रातील यात्रेकरूंचे प्रमाण तुलनेने कमी असून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार कडून त्यादृष्टीने प्रयत्न होत नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते. अशा यात्रेसाठी प्राणायाम, योग्य, चालण्याचा सराव असणे गरजेचे असते. महाराष्ट्रातील तरुणांनी आपली शारीरिक व मानसिक क्षमता अजमावून पाहण्यासाठी तसेच वृद्धिंगत करण्यासाठी कैलास मानसरोवर यात्रा अवश्य करावी. त्यातून आपले जीवन सार्थकी लागल्याचा आनंद मिळू शकेल”  दृक्श्राव्य मध्यमा द्वारें यात्रेतील अनेक रोमहर्षक अनुभव कथन केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक राजेंद्र घावटे यांनी केले.  आभार प्रदर्शन संपत बोत्रे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.