IND vs ENG : इंग्लंड संघाची जोरदार आघाडी

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : लॉर्ड्स वरील मानहानीकारक पराभावाने डिवचले गेलेल्या इंग्लंड संघाने काल सुरू केलेली चांगली कामगिरी आजही उत्तमरित्या सुरू ठेवत दुसऱ्या दिवशीच तिसऱ्या कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे.

हेडिंगले येथील लीड्स मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंड संघांने आपली प्रतिष्ठा पूर्णपणे पणाला लावली आहे, त्यातच भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा घेतलेला आत्मघातकी निर्णय पूर्णपणे अंगलट आलेला आहे. काल भारताला केवळ 78 या किरकोळ धावसंख्येवर सर्वबाद करून दिवसाखेर चाळीस धावांची आघाडी घेणाऱ्या इंग्लंड संघाने आजही उत्तम फलंदाजी करत आजच्या दुसऱ्या दिवसाखेर तब्बल 345 धावांची मोठी आघाडी घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

इंग्लंड कर्णधार जो रूट ने आज आपले 23 वे कसोटी शतक गाठत आजच्या दिवसाच्या खेळावर आपली छाप सोडली आहे, त्याला पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड मलान, हशीब हमीद यांच्यासह रॉरी बर्न्स यानेही चांगली साथ देत इंग्लंड संघाला या सामन्यात आपली बाजू मजबूत करण्यात मोठा वाटा उचलला. कालची नाबाद जोडीतला रॉरी बर्न्स आज 135 धावा फलकावर असतानाच 61 धावा काढून शमीची शिकार झाला. तर त्याचा जोडीदार हबीब हशीद वैयक्तिक 68 धावा करुन जडेजाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला, यानंतर मात्र कर्णधार जो रूट आणि डेविड मलान या जोडीने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेत भारतीय गोलंदाजी बोथट ठरवली आणि संघाला मजबूत स्थिती गाठून दिली.

यादरम्यान जो रूटने आपले 23 वे कसोटी शतक झळकावत आपला मागील कसोटीतला उत्तम फॉर्म पुढे चालूच ठेवला तर डेव्हिडने सुद्धा 70 धावा काढत आपले पुनरागमन सार्थ ठरवले. सर्वोत्तम जलदगती गोलंदाजी असा नावलौकिक असलेला भारतीय तोफखाना आज मात्र या कीर्तीला जागला नाही ,याचाच योग्य फायदा उठवून इंग्लंड संघातील प्रत्येक फलंदाजाने वाहत्या गंगेत हात धुत वैयक्तिक विक्रम रचले.

पुनरागमन करणाऱ्या इंग्लिश डेव्हीड मलान, हशीब आणि ओव्हर्टन यांनी आपल्या ऊत्तम कामगिरीच्या जोरावर आपला ठसा उमटवला तर भूतकाळातल्या कामगिरीच्या जोरावर संघात टिकेलेल्या अजिंक्य रहाणे, पुजारा आणि इशांत शर्मा या त्रयीने आपल्या सुमार कामगिरीने संघ व्यवस्थापन समितीला खोटे ठरवले आहे.

कसोटी क्रिकेट मध्ये याआधी कितीही चमत्कार घडले असले तरी एकंदरीतच भारतीय संघाची कामगिरी बघता इंग्लिश संघाचा विजय फारसा दूर नाही असे काहीसे खेदाने आजच्या दिवसाचा खेळ बघता म्हणावे वाटते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.