Vadgaon Maval News : पंचायत समिती आवारातील ड्रेनेज गळतीमुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ड्रेनेजच्या गळतीमुळे शेवाळ निर्माण झाले आहे. याच परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून शेकडो विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. ड्रेनेजमुळे झालेल्या शेवाळावरून हे विद्यार्थी जीव धोक्यात घालून येजा करीत असतात. शेवाळावरून घसरून पडण्याची, गंभीर दुखापत होण्याची भीती पालकांमधून व्यक्त केली जात आहे. याच परिसरात पंचायत समिती असल्याने राजकीय पुढा-यांचा सतत राबता असतो. हे शेवाळ दिसूनही राजकीय पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करतात तसेच या परिसरात आरोग्य विभागाचे कार्यालय, खादी ग्रामोद्योग कार्यालय, रेल्वे स्टेशन देखील आहे.

मावळ पंचायत समिती आवारामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांचे जीवन आरोग्याच्या व अपघाताच्या दृष्टीने धोक्याचे बनले आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर अखंडपणे शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थी मधल्या सुट्टीच्या वेळांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी उभारलेले स्व. केशवराव वाडेकर बाल उद्यानामध्ये मुले खेळत असतात, या ठिकाणी झालेल्या ड्रेनेज गळतीमुळे, शेवाळ निर्माण झाल्याने विद्यार्थी खेळताना पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी वावर असून देखील दुर्लक्ष होत आहे.

शेजारीच मावळ तालुका खादी ग्रामउद्योग संघाचे कार्यालय,रेल्वे स्टेशन सुद्धा आहे. शेजारीच येण्याचा -जाण्याचा मार्ग असल्याने खूप वर्दळही असते. परंतु या बाबत प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांतील राजकीय नेते आदी कोणीच याची गांभीर्याने दखल घेत नसुन हे सर्व बघ्याच्या भूमिकेतच असल्याचे दिसते आहे. अशी पालकांमध्ये व नागरिकांमध्ये चर्चा आहे. एखादा विद्यार्थी पाय घसरून पडला तर त्याला मे महिन्याची सुट्टी कदाचित दवाखान्यातच काढावी लागती की काय? असाही प्रश्न पालकांकडून व नागरिकांमधून उपस्थित झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या होणा-या अपघाताला प्रशासनालाच जबाबदार धरावे लागेल. लवकरात लवकर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीला जाग यावी हीच अपेक्षा पालकवर्गातून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.