Akurdi News: जलतरण तलाव बंदच; सहाय्यक आयुक्त म्हणतात पूर्ण क्षमेतेने सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचे स्थापत्य विषयक काम पूर्ण झाले असून तलाव आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याचे क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. प्रत्यक्षात मात्र तलाव बंदच आहे. त्यामुळे प्रशासनाचा खोटारडेपणा समोर आला. तात्काळ तलाव सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक अमित गावडे यांनी केली.

जलतरण तलावाचे स्थापत्य विषयक काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज (बुधवार) पासून हा तलाव 100 टक्के क्षमतेने सुरु झाला आहे. शनिवार ते गुरुवार सकाळी सहा ते दहा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा या वेळेत सर्वांसाठी 100 टक्के क्षमतेने सुरु तलाव सुरु राहणार आहे. शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे. नागरिकांनी जलतरण तलावाचा पोहोण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले खरे प्रत्यक्षात मात्र जलतरण तलाव बंदच आहे. तलाव बंदच असताना सहाय्यक आयुक्तांनी सुरु झाल्याचे कसे सांगितले, असा सवाल उपस्थित होतो. दरम्यान, तलाव चालू झाला होता, तसा अहवाल मला आला होता. काही समस्येमुळे बंद झाला असेल तर माहिती घेत असे शिंदे यांनी सांगितले.

माजी नगरसेवक अमित गावडे म्हणाले, ”स्थापत्य विषयक कामे पूर्ण झाली नाहीत. फिल्टर झालेले पाणी तलावात राहत नाही. त्यामुळे तलाव बंद केला आहे. आता उन्हाळा सुरु झाला आहे. पुढील महिन्यात शाळांनाही सुट्या लागतील. मुलांना पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तलाव सुरु होणे आवश्यक आहे. प्रशासनाने तत्काळ तलावाचे काम पूर्ण करावे आणि जलतरण तलाव सुरु करावा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.