Talawade News: ‘गुंठेवारी कायद्याने नियमितीकरणास अपात्र ठरत असल्याने रेडझोनमधील अवैध बांधकामांचा शास्तीकर रद्द करा’

नगरसेवक प्रवीण भालेकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – रेडझोनबाधीत अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्याने नियमितीकरणास अपात्र ठरत आहेत. त्यामुळे गुंठेवारी कायद्यात नियमित होत नसलेल्या मिळकतींचा अवैध बांधकाम शास्तीकर पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी राज्य सरकारकडे केली.

याबाबत उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात नगरसेवक भालेकर यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने राज्यातील महापालिका हद्दीमधील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमामध्ये सुधारणा केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश 18 ऑक्टोबर रोजी काढला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरामधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

तथापि, गुंठेवारी कायद्यानुसार रेडझोन मधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास अपात्र ठरत असल्याने वर्षानुवर्षे या भागामध्ये राहत असलेल्या गोरगरिब नागरिकांवर अवैध बांधकाम शास्तीकराची टांगती तलवार कायम आहे. रेडझोन जाहीर होण्यापूर्वीच यातील अनेक मिळकती लघुउद्योजक, कामगार व स्थानिक नागरिकांनी विकसीत केलेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या मिळकत धारकांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. रेडझोन हद्दीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीमध्ये 2008 नंतरच्या अनाधिकृत बांधकामावर लावलेला अवैध बांधकाम शास्तीकर अयोग्य आहे.

शास्तीकरांमुळे अनेक नागरिकांच्या मिळकत कराची थकबाकी घर आणि जागेच्या किंमतीपेक्षाही अधिक झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. रेडझोन परिसरातील अनधिकृत बांधकामे नियमित होण्याची शक्यता नसल्याने या मिळकतीवरील शास्तीकर पूर्णतः माफ करून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती नगरसेवक भालेकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.