Talegaon : मिनी बसच्या धडकेने माजी नगराध्यक्षांच्या भावाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असताना मिनी बसची पाठमागून धडक बसून झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव टेलिफोन एक्सचेंज समोर घडला.

रत्नाकर शंकरराव शेडगे (वय 63 रा. जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते तळेगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शालिनी खळदे यांचे बंधू आहेत. दिवंगत माजी नगरसेवका शोभाताई शेडगे यांचे ते पती होत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेडगे त्याच्या दुचाकीवरून (एम एच 14 / डी सी 4685) तळेगाव स्टेशनकडून गावाच्या दिशेने निघाले होते. मेथडिस्ट चर्च हॅचिंग स्कूलजवळ असलेल्या टेलिफोन एक्सचेंज समोर आले असताना शेडगे यांच्या दुचाकीला मिनी बस टेम्पो ट्रॅव्हलरने (एम एच 12 / एच बी 9559) पाठीमागून धडक दिली.. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. संबंधित बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, तळेगाव स्टेशन चौकाकडून तळेगाव या मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या तीन दिवसांत तळेगाव शहरात झालेला हा तिसरा अपघात आहे. वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून हेल्मेट वापरावे, असे आवाहन तळेगाव पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.