Talegaon : दोघांना बेदम मारहाण करत टोळक्याचा राडा

Talegaon : Both were beaten to death

एमपीसी न्यूज – दोघांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पाच जणांच्या टोळक्याने राडा केला. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी मावळ तालुक्यातील गोडुंब्रे येथे घडली. तसेच टोळक्याने घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आहे.

तानाजी दगडुबा सावंत (वय 40), रामचंद्र चंद्रकांत सावंत (वय 32), श्यामा चंद्रकांत सावंत (वय 26), सचिन चंद्रकांत सावंत (वय 20), तुषार शांताराम सावंत (वय 45, सर्व रा. गोडुंब्रे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकाश गणपत कदम (वय 61, रा. गोडुंब्रे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 24) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सर्व आरोपी संगनमत करून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन फिर्यादी कदम यांच्या घरासमोर आले. ‘तुझ्या भाच्याने व मुलाने बाहेरगावातील मुलांना बोलावून घेऊन गावामध्ये दहशत निर्माण करून आमच्या गाड्या फोडल्या आहेत’ असे म्हणत आरोपींनी ‘ते दोघे घरी आहेत का’ अशी कदम यांच्याकडे विचारणा केली.

त्यावर फिर्यादी यांनी ‘ते दोघे घरी नाहीत, काय झाले आहे’ असे आरोपींना म्हटले. यावरून आरोपी तानाजी याने लोखंडी रॉड, श्यामा याने लाकडी दांडक्याने आणि तुषार याने हाताने कदम यांना मारहाण केली. यात कदम यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. आरोपी रामचंद्र आणि सचिन या दोघांनी कदम यांना शिवीगाळ केली.

ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी कदम यांचे भाऊ सुदाम कदम आले. आरोपी रामचंद्र याने लोखंडी रॉड आणि सचिन याने लाकडी दांडक्याने मारून सुदाम कदम यांनाही जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like