Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांच्या मदतीला ‘इंद्रायणी’चा हात

तीन लाख रुपयांचा निधी व जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी रवाना

एमपीसी न्यूज- आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण प्रत्येकानं पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, गोरखभाऊ काळोखे, खजिनदार चंद्रकांत शेटे, कार्यवाह रामदास काकडे, शैलेश शहा, दीपक शहा, संजय साने, निरुपा कानेटकर, विलास काळोखे, सुरेश धोत्रे, माजी नगराध्यक्षा मायाताई भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगलाताई भेगडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा ज्योती शिंदे, युवती अध्यक्षा निशा पवार, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, बाळासाहेब शेळके, महाविद्यालययाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य जी. एस. शिंदे, उपप्राचार्य, प्रा. अशोक जाधव, महाविद्यालय विकास समिती सदस्य, तळेगावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मावळ परिसरातील विविध संघटनांनी कृष्णराव भेगडे यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना कृष्णराव भेगडे म्हणाले, “सामाजिक कार्यात मी कधीही राजकारण येऊ दिले नाही. संस्था ह्या विचाराच्या पायावरच उभ्या केल्या. शिक्षण, शेती, आरोग्य आदी देश हिताच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करता आले. मावळच्या विकास कामांचा शिलेदार होता आल्याने, मी भरून पावलो आहे”

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी संस्थेच्या वतीने तीन लाख रुपये निधी दिल्याचे भेगडे यांनी जाहीर केले. यापूर्वी केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपये निधी महाविद्यालयाने जमा केल्याचा उल्लेखही कृष्णराव भेगडे यांनी केला.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी तीन लाख रुपयांचा निधी व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. वस्तू रवाना करण्याची जबाबदारी संस्थेचे सदस्य शैलेश शहा यांच्याकडे सोपविण्यात आली.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी मावळभूषण कृष्णराव भेगडे यांच्या संसदीय, सहकार, आरोग्य, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचा आढाव घेतला. तसेच ‘समाजचिंतन: श्री. कृष्णराव भेगडे गौरवग्रंथाचे’ कार्य सुरू असल्याची माहिती दिली.

यावेळी खजिनदार चंद्रकांत शेटे यांनी कृष्णराव भेगडे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकताना नवीन नेतृत्व संधी आणि विकास यांचा परिचय करून दिला. तसेच कृष्णराव भेगडे यांच्या कार्याचा पुढील पिढीला इतिहास कळावा म्हणून यावर्षीपासून शालेय गट नववी-दहावी, महाविद्यालयीन पातळीवर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही नमूद केले.

दीपक शहा यांनी भेगडे साहेब म्हणजे मावळ तालुक्यातील जनतेसाठी एक प्रकारे दैवतच असल्याचा कृतार्थभाव आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.

सूत्रसंचालन प्रा. संदीप भोसले व सौ. वीणा भेगडे यांनी केले. आभार निरुपा कानिटकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.