Talegaon Dabhade: जेसीबीने जलवाहिनी तोडल्याप्रकरणी नगराध्यक्षांचा पती व नगरसेवकाविरोधात गुन्हा

जेसीबी सुपरवायझरला अटक

एमपीसी न्यूज – जेसीबी पाठवून तळेगाव दाभाडे येथील मोहर प्रतिमा गृहप्रकल्पाची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तोडून 8 लाख रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून नगराध्यक्षांचा पती आणि नगरसेवक यांच्यासह इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जेसीबी सुपरवायझरला अटक करण्यात आली आहे.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे पती संदीप जगनाडे व नगरसेवक अमोल शेटे तसेच दोन जेसीबीचालक व इतर दोघे अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष तिलोटकर (वय 37, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.

तिलोटकर यांच्या कंपनीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नियमांचे पालन करीत मोहर प्रतिमा गृहप्रकल्पासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्यासाठी 360 मीटर लांबीची पाईपलाईन टाकली होती. दरम्यान संदीप जगनाडे आणि नगरसेवक अमोल शेटे यांनी दोन जेसीबी व दोन व्यक्तींना पाठवून ती पाईपलाईन उखडून 8 लाख रुपयांचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.