Talegaon Dabhade: गर्दी टाळण्यासाठी भाजी विक्रीचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर वापरावा – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात वॉर्डनिहाय भाजीपाला व फळविक्रीची व्यवस्था करून कोठेही गर्दी होऊ न देण्याचा यशस्वी प्रयोग तळेगावमध्ये राबविण्यात आला असून भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात यावा, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आमदार शेळके यांनी काल (सोमवारी) तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात कोरोना प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत शेळके यांनी पाच कलमी कार्यक्रमाची आखणी केली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद,लोणावळा नगरपरिषद, वडगांव नगरपरिषद व देहूरोड कँन्टोन्मेंटमधील सर्व मुख्यधिकारी व परिसरात सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकारी यांनी आपआपल्या भागात या पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन शेळके यांनी केले.

शहरातील सर्व रस्ते व महत्त्वाच्या ठिकाणी औषध फवारणी करावी, प्रत्येक वॉर्डात भाजीपाला व फळविक्रीसाठी स्टॉल उभारावेत, घरपोच औषध सुविधा, घरपोच किराणा माल सुविधा उपलब्ध करून द्यावी व संचारबंदीच्या काळात पोलीस व शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्वयंसेवकांचे पथक नेमावे, असे महत्त्वाचे निर्णय बैठकीत झाले.

बैठकीतील निर्णयानुसार  प्रथम औषध फवारणी करून  पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या नियोजनाखाली शहरात 16 ठिकाणी भाजीविक्री व फळविक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी चार भाजी विक्रेते व एक फळविक्रेता यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. भाजी व फळांबरोबर या ठिकाणी सॅनिटायझरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एका स्टॉलसमोर एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक थांबणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. ग्राहकांना भाज्या व फळे निवडून घेण्याची मुभा नाही. विक्रेत्यांना चढ्या भावाने भाजी व फळे विकण्यास मनाई करण्यात आली आहे.

या प्रभागनिहाय भाजी विक्रीच्या उपक्रमाला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात कोठेही भाजी खरेदीसाठी गर्दी झाली नाही.

कोरोना निर्मूलनासाठी निश्चित केलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी  केल्याबद्दल सर्व मुख्यधिकारी, सर्व पदाधिकारी आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी व सर्व  कर्मचारी वर्गाचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी जाहीर आभार मानले.

भाजी विक्री केंद्रांची यादी

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने  तळेगाव स्टेशन येथे दहा तर गाव भागामध्ये सहा भाजीपाला विक्री केंद्र स्थापन केल. याची विक्रीची वेळ दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगर, शुभम कॉम्प्लेक्स मागे, मनोहर नगर गेट समोर, विद्याविहार कॉलनी परिसर, बालाजी मंदिर, वीरचक्र मंडळ चौक समोर, म्हाळस्करवाडी, स्वराज नगरी, सिंडीकेट बँकेसमोर, स्टेशन चौक येथे तर गाव विभागासाठी जिजामाता चौक,  चावडी चौक, घोरावडी स्टेशन जवळ बॉम्बे वर्कशॉप समोर, कडोलकर कॉलनी, शिवाजी मित्र मंडळ, गणेश कॉलनी 2,  जव्हेरी कॉलनी याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. दोन गाळ्यांमध्ये पाच पाच फुटाचे अंतर ठेऊन व्यवसाय करायचा आहे,  असे मुख्याधिकारी दीपक झिंजाड  यांनी सुचवले आहे.

संचारबंदीला चांगला प्रतिसाद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे  परिसरात शासनाने आदेश दिल्यापासून कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. त्याला सर्व स्तरातील व्यापाऱ्यांनी, व्यवसायिकांनी 100%  आपले व्यवसाय बंद ठेवून पाठिंबा दिला. शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या या सूचना व नियम यांचे पूर्णपणे पालन करत आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.