Talegaon Dabhade: शहरात एकही कोरोनाबाधित नाही, लिंब फाटा ते स्टेशन चौक रस्त्यावर एकेरी वाहतूक

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विषाणूचा वाढता संसर्ग आणि प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तळेगाव दाभाडे पोलिसांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परदेशात जाऊन आलेल्या एकूण 47 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 24 जणांची 14 दिवसानंतरची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. लिंब फाटा ते तळेगाव स्टेशन चौक हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी ‘वन वे’ करण्यात आला आहे. 

 

शहरातील नागरिकांच्या आरोग्याला बाधा येऊ नये म्हणून नगरपरिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असून त्यात त्यांना चांगले यश आल्याचे दिसून येत आहे. तळेगाव शहरात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही. कोरोनाबाबत कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

 

महामार्गापासून मारूती मंदिर, जिजामाता चौक ते स्टेशन चौक या मुख्य रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर  एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. स्टेशनवरून गावात येण्यासाठी स्टेशन चौक, चाकण रोडमार्गे, तळेगाव फाटा व तेथून महामार्गाने लिंब फाटा येथे येऊन तेथून गावात जावे लागत आहे.

 

परराज्य व परदेशगमन केलेल्या नागरिकांचा सर्व्हे  करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव शहरात 13 मार्च पासून ‘होम क्वारंटाईन’ला सुरुवात झाली. आजपर्यंत तळेगाव शहरातील एकूण 47 नागरिकांचे ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकांची देखरेख आहे. विलगीकरणात देखरेखीखाली असलेल्यापैकी कोणीही पाॅझिटीव्ह नाही.

 

‘होम क्वारंटाईन’ असलेल्यांपैकी 14 व्या दिवशी नागरिकांची तपासणी केली असता आजपर्यंत 24 नागरिकांचे आरोग्य उत्तम असल्याची माहिती तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली. त्यांना कोणताही आजार नसल्याचे सांगण्यात आले. तळेगाव स्टेशन आणि गाव भागात जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.

 

तळेगाव स्टेशन विभागातील प्रमुख चौक आणि  रस्त्यांसह गाव भागातील रस्ते  प्रेशरच्या पाण्याने धुऊन काढण्यात आले आहेत. प्रमुख रस्ते अग्निशमन बंबामधील पाण्यात जंतुनाशके टाकून त्यांची सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. तसेच  विविध कॉलनी  भागातही  जंतुनाशक पावडर टाकून धुरळणी करण्यात आली.  नगरपरिषदेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर आहेत.अन्य  कर्मचा-यांमधून गरजेपुरते कर्मचारी ठेऊन बाकी कर्मचा-यांना सुट्टी देण्यात आली आहे.

 

नागरिकांनी  घरातच थांबावे,आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी  दीपक झिंजाड आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे  डॉ. प्रवीण कानडे यांनी केले आहे.

 

कोरोनाच्या महामारी पासून बचाव होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शासनाने १४४ कलमाव्दारे जमावबंदीचा आदेश दिला आहे.आदेशाचा अवमान करणारांची पोलिसांकडून गय केली जात नाही. बेजबाबदारपणे गाड्या चालविणे, घोळका करणे, गप्पा मारणे,आरोग्याची काळजी न घेणे अशा  काही सडक लहरी आणि टवाळखोर  तरुणांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या  मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळेगाव शहरास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. महत्वाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.